Kheliyad

Advertisement
Sports Review

स्विमिंगला ‘सनस्ट्रोक’!

April 11, 2016 · · comments


ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोकचे कौशल्य असलेल्या स्विमिंगला सध्या दुष्काळाचा ‘सनस्ट्रोक’ बसला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट गहिरे होत असून, त्याचा मोठा फटका पाण्यावरच्या खेळांना बसला आहे. महाराष्ट्रातील सर्वच तरण तलाव बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ३२ वर्षांत प्रथमच शहरातील तरण तलाव बंद करण्यात आले आहेत. मात्र, स्विमिंग टँक बंद करण्याच्या निर्णयावर जलतरणपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. जेथे पर्यायी व्यवस्था आहे ते स्विमिंग टँक सुरू करायला हवे, अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली आहे.
महेश पठाडे, नाशिक rhythm00779@gmail.com/Mob. 8087564549



‘किमान सावरकर तलाव सुरू करा!’

नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, पंचवटी, सिडको आणि सातपूर येथे महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. याशिवाय निवेक व भोसला मिलिटरी स्कूलचा प्रत्येकी एक अशा दोन तरण तलावांसह एकूण सात तरण तलाव शहरात आहेत. महापालिकेने २१ मार्चपासूनच शहरातील सर्वच तरण तलाव बंद केल्याने सराव पूर्णपणे थांबला आहे. महापालिकेव्यतिरिक्त दोन तरण तलाव सुरू आहेत. कारण त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे. मात्र, ते स्पर्धात्मक सरावासाठी पूरक नाहीत. महापालिकेच्या तरण तलावांपैकी सावरकर तरण तलावाकडेही पर्यायी व्यवस्था असल्याने किमान हा तरण तलाव सुरू करावा, अशी मागणी पुढे येत आहे. महापालिकेने त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

विहीर कधी दुरुस्त होणार?

सावरकर तरण तलाव शहरातील एकमेव सक्षम तलाव आहे, ज्याला महापालिकेच्या पाण्याची गरज पडणार नाही. या तलावाच्या डायव्हिंग पुलाजवळ विहीर असून, तिला पाणी भरपूर आहे. मात्र, गाळ साचल्याने ही विहीर वापराविना पडून आहे. या विहिरीचा गाळ काढून तलावासाठी ही विहीर उपयोगात आणावी यासाठी गेल्या चार- पाच वर्षांपासून नागरिक, जलतरणपटू, प्रशिक्षक आदींनी महापालिकेला प्रस्ताव दिला होता. मात्र, अद्याप त्यावर महापालिकेने कोणताही निर्णय न घेतल्याने विहीर वापराविना पडून आहे. तलावाकडे बोअरिंगही असल्याने महापालिकेच्या पाण्याची गरज पडत नाही, असा दावा जलतरणपटूंनी केला आहे.

प्रेरणादायी यश

Prasad Khairnar
  • सेलिबल पाल्सी आजार असतानाही हंसराज पाटील याने अपंगांच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. सध्या ते नायब तहसीलदार आहेत.
  • नाशिकचा प्रसाद खैरनार याने ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजारावर मात करीत सहा राष्ट्रीय स्पर्धांत ९ पदके मिळविली. विशेष म्हणजे त्याच्या आजारावर जलतरण हाच एकमेव रामबाण उपचार ठरला.

असेही दावे...

  • तरण तलावाचे पाणी फिल्टर होताना किमान पाच ते सात हजार लिटर पाणी वाया जाते. तसं तर घराघरांत किती तरी पाणी वाया जातं. ते तलावातील पाण्यापेक्षा कित्येक लिटरने अधिक असते. त्याचे काय?
  • स्विमिंग टँक बंद करणे सोपे आहे. मात्र, जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्याच्या सूचना दिल्या जातात. तेव्हा पाणी वाया जात नाही काय?
  • टंचाईचं वास्तव तलावांना मान्य आहे. मात्र, तलावच का बंद ठेवले? शहरातील सर्व्हिस स्टेशन बंद का केले जात नाहीत?

 नाशिकची जलतरण डायरी

  • तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांच्या प्रयत्नाने १४ एप्रिल १९८४ रोजी महापालिकेचा पहिला जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला.
  • बाळ सम्राट धारणकर सहा महिन्यांचा असतानाच पोहण्यास शिकला. १९९० मध्ये भारतातील सर्वांत लहान वयाचा जलतरणपटूचा मान मिळविणारा पहिला खेळाडू. त्याचा हा विक्रम तीन वर्षांपूर्वी रोनित खानापुरे याने मोडला. वयाच्या पाचव्या महिन्यात त्याने स्विमिंग केले.
  • सतत ३१ तास पाण्यावर तरंगण्याचा जागतिक विक्रम नाशिकच्या सुषमा जोशी या महिला जलतरणपटूच्या नावावर.
  • १९८५-८६ मध्ये पुरुष गटात सतत ५५ तास पाण्यावर तरंगण्याचा विक्रम घनश्याम कुंवर या नाशिकच्या जलतरणपटूच्या नावावर
  • संकरॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे ५ किलोमीटरचे सागरी अंतर तीन वेळा जिंकणारा नाशिकचा जुनेद खान महाराष्ट्राचा पहिला जलतरणपटू ठरला. त्याने मुंबईचे अर्जुन पुरस्कारप्राप्त अविनाश सारंग यांचा २५ वर्षे अबाधित राहिलेला विक्रम मोडीत काढला.

डायव्हिंग प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू ः
विराज पाटील, भाऊसाहेब दिवे, आदित्य इनामदार, स्वराज पाटील

जलतरणातील आंतरराष्ट्रीय खेळाडू ः
कौशल कारखानीस, कुणाल कुंडाजे, जुनेद खान, आरीफ आदमजी, सोनाली भावसार, संदीप राजेबहाद्दर

जलतरणपटूंनी दिले असे पर्याय

  • पाणीबचत करण्यासाठी शॉवरचा वापर पूर्णपणे थांबवता येईल.
  • ज्या तलावांकडे बोअरिंगची सोय आहे, तेथे शॉवरसाठी बोअरिंगचे पाणी वापरता येईल
  • खेळाडू व नागरिकांसाठी सकाळ व सायंकाळ अशा केवळ दोन बॅच सुरू ठेवता येतील.
  • ज्या जलतरण तलावांकडे पर्यायी व्यवस्था आहे, असेच तलाव सुरू करावेत.
  • तलावातील पाणी वारंवार बदलण्याची गरज नाही.

क्लोरिनची मात्रा वाढल्यास धोका

स्विमिंग पूलमध्ये क्लोरिनचा उपयोग पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. मात्र, स्विमिंग हृदयासाठी जसे चांगले असते तसे क्लोरिनची मात्रा वाढल्यास हृदयाला धोकाही निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. नेत्र व त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, सन बर्न, कान दुखणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी वारंवार क्लोरिनचा उपयोग करावा लागत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

का सुरू हवे स्विमिंग टँक?

  • स्पर्धात्मक यशासाठी...
  • उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये विविध स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर होते. दरवर्षी एप्रिल- मे महिन्यापासून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा जाहीर होतात. महिनाभरात सबज्युनिअर, ज्युनिअर, तसेच जुलै-ऑगस्टमध्ये शालेय जलतरण स्पर्धा असतात. त्यामुळे सरावासाठी किमान दोन महिने खेळाडूंना पुरेसे असतात. मात्र, हेच दोन महिने स्विमिंग टँक बंद असल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • व्याधींवर उपायासाठी...
  • ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना शारीरिक व्याधींवर स्विमिंगचा सर्वोत्तम उपाय डॉक्टरांकडून सुचवला जातो. कमी कालावधीत चांगले परिणाम स्विमिंगमुळे होत असल्याने रुग्णांना स्विमिंग टँक सुरू होणे आवश्यक असल्याचे वाटते. नियमित स्विमिंगमुळे हृदयरोगाचा धोका टळतो. फिटनेससाठी हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो.
  • नवोदितांच्या प्रशिक्षणासाठी...
  • उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये स्विमिंग शिकण्याकडे मुलांचा कल वाढतो. याच काळात नवोदितांना स्विमिंग शिकण्याची संधी असते. त्यासाठी स्वतंत्र बॅचेस सुरू केले जातात. पावसाळ्यात, हिवाळ्यात स्विमिंग प्रशिक्षणाकडे फारसे कोणी वळत नाहीत. त्यामुळे नवोदितांचे मोठे नुकसान होणार आहे.

स्विमिंगचे फायदे

  • नियमित स्विमिंगने प्रतिकारक्षमता, लवचिकता वाढते
  • स्विमिंगने थकवा आल्यानंतरही प्रसन्नता जाणवते
  • हात आणि पायाच्या मांसपेशी मजबूत होतात
  • कमी वेळात जास्त कॅलरी घटविण्यासाठी स्विमिंग सर्वोत्तम
  • जिमपेक्षा स्विमिंगमध्ये १५ पट अधिक मेहनत असते
  • त्वचा स्वच्छ व नितळ राहते, तसेच मेहनतीची क्षमता वाढते
  • सांधेदुखी व हाडांच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी स्विमिंग करणे उत्तम
  • नियमित स्विमिंगमुळे हृदयरोग होत नाही
  • रक्ताभिसरण प्रक्रियेसाठी स्विमिंग सर्वोत्तम उपाय मानला जातो.

दृष्टिक्षेपात तरण तलाव

  • ०७ तरण तलाव नाशिकमध्ये
  • ३२ वर्षांत प्रथमच स्विमिंग टँक बंद
  • २१ मार्चपासून स्विमिंग टँक बंद करण्याचा निर्णय

हे तत्कालिक संकट

दुष्काळाचे सावट हे जलतरणावर आलेले तत्कालिक संकट आहे. कालांतराने तरण तलाव पुन्हा सुरू होतील, अशी आशा काही नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वी जुलै २०१४ मध्ये महापालिकेचे पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना देण्याचा घाट महापालिकेने घातला होता. मात्र, त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. जलतरण तलावांचा खर्च परवडत नसल्याने ते खासगी संस्थांना चालविण्यास द्यावे असा क्रीडा मसुद्यात उल्लेख होता.

राज्याबाहेर स्विमिंग सुरू!

दुष्काळाचे सावट महाराष्ट्रावरच नव्हे, तर संपूर्ण देशावर गडद होत आहे. असे असले तरी महाराष्ट्रात पाणीकपातीला मार्चपासूनच सुरुवात झाल्याने त्याचा फटका जलतरण तलावांना बसला आहे. अन्य राज्यांमध्येही पाणीकपातीचा निर्णय घेतला असला तरी स्विमिंग टँक सुरू आहेत. राज्यालगतच्या गुजरात, मध्य प्रदेश, तसेच केरळ आदी राज्यांमध्ये जलतरण तलाव बंद करण्यात आलेले नाहीत. तेथे नियमित सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते यांनी दिली.

पाण्याचा खेळ

  • २२ मार्च २०१६ ः लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी अडीच हजार लिटर पाण्याची नासाडी; टीकेची झोड उठल्यानंतर सामने रद्द
  • ३ एप्रिल ः पुण्यातील स्विमिंग टँकचे पाणी तीन वर्षे बदलले जात नाही, असा स्विमिंग टँक चालकांचा अजब खुलासा; या पाण्याने पुणेकरांचे आरोग्यास धोकादायक असल्याची पुण्याच्या महापौरांची भीती
  • ७ एप्रिल ः आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविण्याची कोर्टाची सूचना
  • ९ एप्रिल ः आयपीएलसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही. भले सामने दुसऱ्या राज्यात हलवले तरी चालतील, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा 


सरसकट सर्वच तरण तलाव बंद करण्यापेक्षा खेळाडूंसाठी किमान एक सायंकाळची बॅच सुरू ठेवायला हवी; अन्यथा स्पर्धात्मक पातळीवर नाशिकचे खेळाडू मागे पडतील. डॉक्टरांनी सुचवल्यानुसार जे स्विमिंगला येतात त्यांच्यासाठी सकाळची बॅच सुरू करण्यासाठी महापालिकेने विचार करायला हवा.
- अविनाश खैरनार, क्रीडा संघटक

जिथे पर्यायी व्यवस्था होऊ शकते, तिथे स्विमिंग टँक सुरू करायला हवे. जिथे पर्यायी व्यवस्था नाही ते स्विमिंग टँक बंद करायला आमची हरकत नाही. डॉक्टरही रुग्णांना पाण्यातल्या एक्सरसाइज सुचवतात. अशा रुग्णांसाठी स्विमिंग उपयोग ठरत असताना सर्वच तरण तलाव बंद करणे योग्य नाही. पर्यायी व्यवस्था असलेले तरण तलाव सुरूच ठेवायला हवे.
- राजेंद्र निंबाळते, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना
(Maharashtra Times, Nashik :  11 April 2016)

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.