Kheliyad

Advertisement
Sports Interview

कुठे गेले खेळांचे फौजदार?

November 26, 2017 · · comments

अपघातात जखमी झालेली सॉफ्टबॉलची राष्ट्रीय खेळाडू हर्षदा माळवे.
नाशिकमध्ये एक राष्ट्रीय खेळाडू जायबंदी होते आणि तिच्या मदतीकडे क्रीडा संघटना ढुंकूनही पाहत नाही हे किती गंभीर आहे! खेळाडूंचा कळवळा असणाऱ्या संघटनांच्या दांभिकतेचा बुरखाच या घटनेमुळे फाडला आहे. हे नाशिकसाठी नक्कीच भूषणावह नाही.

महेश पठाडे
rhythm00779@gmail.com

Follow me :
      www.linkedin.com/in/maheshpathade03    


मैदानावर खेळाडूच्या कौशल्याने नाशिकचा लौकिक वाढतो, तसा आमचाही वाढतो. पुरस्कार, मानमरातब सगळं काही आम्हाला मिळतं; पण तोच खेळाडू मैदानाबाहेर जीवन-मरणाशी झुंजत असेल तर आम्ही त्याच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही, ही क्रीडा संघटनांची वृत्ती नाशिकसाठी अजिबात भूषणावह नाही. 

नाशिकमध्ये हर्षदा शिवकुमार माळवे ही राष्ट्रीय खेळाडू अपघातात जायबंदी झाली. एका पोलिसाच्या खासगी वाहनाने दिलेल्या धडकेत हर्षदाच्या कंबरेची दोन्ही हाडे, मांडीचे हाड, दोन्ही मनगटांचा चुरा, डाव्या पायावर खोलवर जखम, तोंडाला टाके पडले, तर सोबत असलेल्या आईचेही माकडहाड मोडले. अपघातप्रसंगी या मायलेकीची काय अवस्था असेल हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. आजच्या महागाईच्या परिस्थितीत गरिबाने कधी आजारी पडू नये असं म्हणतात. या मायलेकींवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंब विसंबून आहे, त्या मायलेकी आज शरपंजरी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहेत. डोक्यावर पाच-सहा लाखांचा खर्च. त्यामुळे या खेळाडूच्या कुटुंबासाठी क्रीडा संघटनांनी मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित होते. दुर्दैवाने असं काही घडलं नाही. हर्षदा सॉफ्टबॉल, आट्यापाट्याची खेळाडू होती, म्हणून या खेळांच्या संघटना मदतीसाठी पुढे आल्या. अन्य संघटनांनी जणू काही आमचा संबंधच नाही अशा अविर्भावात याकडे पाहिलं. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या मुलीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला हा भाग निराळा. मात्र, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले नसते तर अशा खेळाडूंना वाऱ्यावर सोडून देणार का? मात्र, या घटनेनंतर एक प्रश्न खेळाडूंना नेहमी सतावत राहील, तो म्हणजे अपघात वा दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या खेळाडूंच्या मदतीसाठी क्रीडा संघटनांकडे काहीच तजवीज नाही का? आजची परिस्थिती पाहता, एकाही संघटनेने खेळाडूंची अपघात विमा पॉलिसी काढलेली नाही. मैदानाबाहेरील दुखणं आम्ही नाही निस्तरणार अशी भूमिका जर संघटना घेत असतील, तर मग मैदानावर जखमी खेळाडूसाठी तरी अशी कोणती मदत केली आहे या संघटनांनी? असं एकही उदाहरण नाही. हर्षदा ही खेळाडू आहे. तिला सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करायला हवी.

हे माहीत आहे का?
मन पिळवटून टाकणाऱ्या या घटना केवळ नाशिकमध्येच घडत नाहीत, तर देशात सगळीकडे हीच परिस्थिती आहे. कोल्हापुरात गेल्या महिन्यात मुबीन सिकंदर या १८ वर्षीय फुटबॉलपटूला बोन मॅरो ट्रान्स्प्लांट या दुर्धर आजाराने ग्रासले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील हातगाड्यावर लिंबू विक्री करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अशा परिस्थितीत मुलावर उपचारासाठी लाखो रुपये वडील आणणार कुठून? सिकंदर कुटुंबाला नंतर मदत झाली, पण ज्यांना अशी मदतही मिळालेली नाही, असे किती तरी मुबीन आपण गमावले असतील? 

अशीच एक दुसरी घटना. दोन महिन्यांपूर्वी वसईतील एका नामवंत शरीरसौष्ठवपटूला पायावरील बोन टीबी या गंभीर दुखण्याने ग्रासले. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकणारा हा शरीरसौष्ठवपटू मदत न मिळाल्याने हतबल झाला. त्यामुळे या खेळाडूला गळ्यात फलक अडकवून लोकांकडेच मदतीची याचना करण्याची नामुष्की ओढवली. अनिल शेट्टी असे या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूचे नाव. या खेळाडूचे पुढे काय झाले, माहीत नाही.

असाच एक जालन्याचा पहिलवान भोईटे अंथरुणाला खिळला आहे. मानेपासून खाली संपूर्ण शरीराची हालचालच होत नाही. आईवडिलांना त्याच्या उपचारासाठी संपूर्ण घरदार विकावं लागलं. मात्र, उपचारासाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त सुरूच ठेवली आहे. दुर्दैवाने त्याच्यावर होणारा अवाढव्य खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. आजही तो शरपंजरी अवस्थेत अंथरुणाला खिळलेला आहे. या घटनेला आता चार वर्षे लोटली आहेत.

विकी शास्ते या मल्लाची करुण कहाणी तर मन हेलावून सोडणारी. भाजीपाला विकून मुलाला पहिलवान करण्याचं स्वप्न त्याच्या आईवडिलांनी पाहिलं. अतिशय गुणी पहिलवान. अनेक कुस्त्या लीलया जिंकल्या. दुर्दैवाने गेल्या वर्षी एका कुस्ती स्पर्धेत बॅक थ्रोचा डाव टाकताना विकीच्या मानेचा मणका मोडला. तीन दिवस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये होता. खर्च अवाढव्य. गाठीला पैसेही नाहीत. कुस्ती मल्लविद्याचे संस्थापक मिलिंद मानुगडे यांनी पैसे जमा केले, पण ते पुरेसे पडले नाहीत. अखेर या पहिलवानाचे निधन झाले. ही करुण अवस्था पाहून या हॉस्पिटलचे डीन डॉ. सुळेही गहिवरले. त्यांनीच एक कल्पना मांडली, की अशा खेळाडूंसाठी तुम्ही निधी का उभारत नाही? पुढे कुस्ती मल्लविद्याने ❛सांगाती❜ या एनजीओ संंस्थेसोबत बँकेत एक अकौंट सुरू केले आणि महाराष्ट्रातील पहिलवानांसाठी ही संस्था आर्थिक मदत करीत वाटचाल करीत आहे. ही खेळाडूंच्या वाट्याला आलेल्या या प्रातिनिधिक घटना आहेत, ज्यामुळे मन हेलावते. मदत, दिलासा देण्यासाठीही कोणी पुढे येत नसेल तर यापेक्षा दुर्दैव या खेळाडूंसाठी दुसरं ते कोणतं?

स्पर्धेवर मात्र अवाढव्य खर्च!

राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद स्वीकारणाऱ्या विविध जिल्हा संघटनांचे बजेट ५ लाखांपासून ३० लाखांच्या पुढे असते. एखाद्या स्पर्धेवर एवढा प्रचंड खर्च करण्याची क्षमता असणाऱ्या संघटनांना एखाद्या जायबंदी झालेल्या खेळाडूसाठी पाच लाखांचा खर्च किती असणार? किमान सर्व संघटनांनी एकत्र येऊन ठरवले असते, तर किमान एक ते दोन हजार रुपये प्रत्येकी काढले तरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा होते. कारण जिल्ह्यातच सुमारे दीडशेच्या आसपास संघटना आहेत. मात्र, स्पर्धेवर अवाढव्य खर्च करणाऱ्या या संघटना खेळाडूच्या मदतीसाठी मात्र हात आखडता घेतात तेव्हा त्या खेळाडूला किती वेदना होत असतील, ज्यांनी याच संघटनांचा लौकिक वाढवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतलेली असते! 

प्रश्न सोडविणार कोण?

ज्या खेळाडूंनी तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा लौकिक वाढवला, त्या खेळाडूंच्या वाट्याला आलेली ही अगतिकता, हतबलता अस्वस्थ करणारी आहे. अशा खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे येता येत नसेल तर कशाला हवा क्रीडा महासंघ, ऑलिम्पिक असोसिएशन​? आधीची परिस्थिती काय वाईट होती​?​ आम्हाला खेळांचे फौजदार होण्यातच धन्यता वाटते. ज्या खेळाडूंच्या कर्तृत्वावर पुरस्कार, मानमरातब मिळतो, त्या खेळाडूंचे, संघटनांचे भलेही प्रश्न सुटो वा न सुटो… क्रीडा क्षेत्रातली ही अनास्था घातक आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विविध खेळांचा क्रीडा महासंघ स्थापन झाला, त्या वेळी वाटले होते, की आता संघटना, खेळाडूंसाठी कोणी तरी एकवटलंय. मात्र, तो एक आभास होता. या संघटनांनी खेळाडूंचा दोन वर्षांत एकही प्रश्न सोडविलेला नाही. आजही स्पर्धेला जाण्यासाठी रेल्वेप्रवासाचे आरक्षण काढायचे असेल तर भुसावळला जावे लागते. ही आरक्षण सुविधा नाशिकला व्हावी, यासाठी महासंघाने का प्रयत्न केले नाहीत? शासनाच्या प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना क्रीडा साहित्य मिळते. नाशिकमध्ये शासनाची जी क्रीडा प्रशिक्षण केंद्रे आहेत, त्या केंद्रात खेळाडूंना क्रीडा साहित्य मिळत नाही. ते मिळावे यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. मुळात आम्हाला हेच माहीत नाही, की असे काही क्रीडा साहित्य शासनाकडून दिले जाते​! महासंघ फक्त स्थापन झाला. पण कार्य शून्य. कदाचित तो व्हॉट्सअॅपवरच अॅक्टिव्ह असेल, थम्ब लाइक करण्यापुरता!! मदतीचे आवाहन करा, तुम्हाला थम्ब करणारे दिसतील. तो लाइकसाठी असतो की आवाहनालाच दिलेला ठेंगा असतो ते तेच जाणो. अर्थात, हर्षदाच्या मदतीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. किमान या मुलीची आस्थेवाईक चौकशी करण्यापुरती तरी एक व्हिजिट दिली असती तर तिला हजार हत्तींचं बळ मिळालं असतं. मात्र, तेवढेही कष्ट कोणी घेतले नाही. नाशिकमधील ऑलिम्पिक असोसिएशनचा तर प्रश्नच नाही. कारण ऑलिम्पिकमध्ये कुठे आहे सॉफ्टबॉल, आट्यापाट्या? मी आणि माझा खेळ हेच डोळ्यांसमोर ठेवून जर या प्रकरणाकडे पाहिले जात असेल तर ते आणखी भयावह. खेळाडूंच्या वाट्याला आलेल्या मन हेलावून टाकणाऱ्या अशा घटनांची मालिका न संपणारी आहे. मात्र, त्यांच्यासाठी  मदतीची छोटीशी पणती आपल्या मनात सतत तेवत असावी हीच अपेक्षा.

का मदत करायला व्हावी?


  • गंभीर दुखापतीमुळे कदाचित खेळाडूमध्ये न्यूनगंड तयार होतो, की आता आपण खेळाडू राहिलो नाही. थोडक्यात म्हणजे स्वतःची ओळख गमावण्याचा धोका खेळाडूत निर्माण होऊ नये म्हणून तिला मदत करायला हवी. 
  • मी संघाची महत्त्वाची किंवा महत्त्वाचा खेळाडू आहे, ही भावना अचानक एका अपघाताने पुसली जाणार ही भावना बळावू नये म्हणून मदत करायला हवी.
  • खेळाडू म्हणून जो सन्मान मिळतो तो आता गमावलाय. म्हणजेच आत्मसन्मान गमावू नये म्हणून मदत करायला हवी.
  • संघात उत्तम खेळाडू म्हणून मिळणारी संधी गमावण्याचा धोका खेळाडूत निर्माण होतो. म्हणजे एक वेळ अशी होती, की माझं संघात असणं खूप महत्त्वाचं आहे अशी जी संघसहकाऱ्यांमध्ये होती, तीच मी आता गमावणार, ही भावना खेळाडूमध्ये निर्माण होऊ नये म्हणून मदत करायला हवी.
  • एक खेळाडू म्हणून समाजाशी जोडले गेलेले नाते एका अपघातात गमावण्याची भीती बळावू नये म्हणून मदत करायला हवी. 
  • आता मी काय करणार, हा प्रश्न भेडसावू नये म्हणून मदत करायला हवी.
  • मैदानात असेपर्यंत जग जिंकण्याचा आत्मविश्वास मनात असायचा. आता तसे होणार नाही ही भावना बळावणे म्हणजे आत्मविश्वास गमावण्याचा धोका. ही भावना बळावू नये म्हणून मदत करायला हवी.
  • खेळाडू म्हणून काही ध्येय, स्वप्न उराशी बाळगताना आज ते अचानक धूसर झाले ही भावना बळावू नये म्हणून मदत करायला हवी.
Maharashtra Times : 26/11/2017

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.