Kheliyad

Advertisement
Diwali Spacial 2019

Jagmohan to Jagjit singh (part 2) ः ट्रेनच्या शौचालयात बसून प्रवास...

October 29, 2019 · · comments

Jagjit Singh ghazals
Jagjit Singh life story

खिशात पैसे नाही म्हणून जगजितसिंग यांनी ट्रेनच्या शौचालयात बसून प्रवास केला...


kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    
याच 1956 च्या काळात जगजित यांना तारुण्याचे संकेत मिळू लागले. अनेक तरुणी त्यांचा कानोसा घेऊ लागल्याचे त्यांना जाणवू लागले. कदाचित ही त्यांच्या सुरेल गायकीची पावतीच म्हणावी लागेल. एका मुलीने तर त्यांना फारच त्रासून सोडले. कारण ते जेव्हा तिच्या घरासमोरून सायकलवर जायचे, तेव्हा नेमकी त्यांची सायकल पंक्चर व्हायची. त्यामुळे त्यांना तिथे थांबावे लागायचे. मग पंक्चरवाल्याला बोलवा. पंक्चर काढेपर्यंत जगजितला ती मुलगी खिडकीतून एकसारखी न्याहाळायची. जगजितला यातलं काहीच माहीत नव्हतं. खूप नंतर त्यांना कळलं, की ती रस्त्यावर चुका पेरून ठेवायची. हेतू हाच, की जगजित यांची सायकल त्यामुळे पंक्चर व्हावी आणि जगजितला तेथे थांबावे लागावे. एकदा तिची ही चलाखी तिच्याच वडिलांनी पकडली.


गंगानगरमध्ये जगजित यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यांचे मोठे भाऊ जसवंतसिंग म्हणाले, की तुला संगीतात रुची आहे. त्यामुळे तू जालंधरला शिक्षण घेतले पाहिजे. तेथे आकाशवाणी केंद्र असल्याने तुला कदाचित तेथे संधी मिळू शकेल. त्यामुळे जगजितने जालंधरमधील डीएव्ही कॉलेजमध्ये बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. त्यामुळे झालं काय, की शिक्षणाचे तीनतेरा वाजले आणि संगीताची नशा परमोच्च स्थानी पोहोचली! होस्टेलमध्ये राहत असल्याने रियाज करण्यास स्वातंत्र्य बेसुमार! पहाटे पाचपासून रियाज सुरू व्हायचा. त्यामुळे त्यांच्या खोलीजवळ राहण्यास अन्य विद्यार्थी तयार होईनात. सायंकाळपर्यंत रियाज संपत नव्हता. होस्टेलवर जो कोणी विद्यार्थी भेटेल, त्याला पकडून गाणे ऐकवण्याचा प्रयत्न जगजित करीत होता. त्यामुळे जगजितपासून बचाव करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करायचा.

ते म्हणायचे, "अरे भाऊ, तुला तर पास व्हायचे नाही, आम्हाला तर शिकू दे..."

त्या वेळी जगजित गमतीने म्हणायचा, "तुम्ही आज मला ऐकत नाही; पण एक वेळ अशी येईल, की मला ऐकण्यासाठी तुम्हाला पैसे मोजायला लागतील."

(2009 मध्ये जगजित यांचे जालंधरला जाणे झाले, तेव्हा त्यांना तेथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी इतका मानसन्मान दिला, की जगजितसिंग भरून पावले. त्या वेळी ते ज्या होस्टेलमध्ये रूम नं. 98 मध्ये राहिले, त्या रूमलाही त्यांनी भेट दिली होती.)
Jagjit Singh songs
Jagjit Singh ghazal songs

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच जगजितने जालंधर आकाशवाणी केंद्रात ऑडिशन दिली. शास्त्रीय संगीत परीक्षेत तर ते पास झाले; पण उपशास्त्रीय संगीतात ते नापास झाले. अर्थात, यातही ते समाधानी होते. कारण त्याला बी श्रेणीचा दर्जा मिळाला. यामुळे आकाशवाणीवर वर्षातून सहा वेळा ते गाऊ शकत होते, तर एकदा त्यांचे लाइव्ह प्रसारण होणार होते. त्याच्यासाठी हेच खूप होते. जालंधर येणे एक प्रकारे सार्थकी लागले होते. नंतर जगजित यांनी उपशास्त्रीय परीक्षाही उत्तीर्ण केली. आता तर आकाशवाणी केंद्राने संगीत विभागाचा कायापालट केला आहे. आजही तेथे जगजित भेट देतात तेव्हा भावूक होतात. त्या वेळी जगजित यांच्यासोबत सुरेंद्र दत्ता असायचे. ते खूप सुंदर सतारवादन करायचे. या संगीतवेडापायी जगजित यांचे शिक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. ना त्यांनी लेक्चर अटेंड केले, ना लॅबमध्ये प्रॅक्टिकल. विज्ञान शाखेचं असं शिक्षण तर कधी नसतंच मुळी. परिणामी, बी.एस्सी.च्या प्रत्येक वर्षासाठी त्यांनी दोन वर्षे घेतली. याच काळात त्यांनी विद्यापीठाच्या युवा स्पर्धेत कॉलेजचे प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत त्यांचं एक गीत प्रचंड लोकप्रिय झालं. ही 1959-60 मधील गोष्ट आहे. त्या वेळी यूथ फेस्टिव्हलचं विद्यार्थ्यांवर गारूड होतं. म्हणजे आधी महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा होते, नंतर विद्यापीठ स्तरावर आणि नंतर आंतरविद्यापीठ स्तरावर. त्यामुळे सर्व विद्यार्थी या स्पर्धेच्या तयारीला लागायचे. जगजित या स्पर्धेत लाइट म्युझिकमध्ये विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करायचे. त्या वेळी त्यांनी सादर केलेल्या गीताने विद्यार्थ्यांना भयंकर वेड लावले. आजही त्यांचे क्लासमेट त्यांना न्यूयॉर्क किंवा कुठेही भेटले, की या गीताची डिमांड होते. ते गीत होते…

रुख़ से परदा उठा दे ज़रा साक़िया
बस अभी रंग-ए-महफ़िल बदल जायेगा
है जो बेहोश वो होश में आयेगा
गिरनेवाला है जो वो संभल जायेगा

तो साधारण 1962 चा काळ होता, ज्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद कॉलेजच्या वार्षिक महोत्सवास आले होते. जगजितवर स्वागतगीत सादर करण्याची जबाबदारी होती. रेडिओवर एक शायर जगजितचे मित्र झाले होते. त्यांच्याकडून स्वागतगीत लिहून घेतले. हे स्वागतगीत असे होते…

स्वागतम् स्वागतम् 
करते है हम
अपने मेहमान को 
प्रणाम करते है हम

हे शायर होते सुदर्शन फाकिर. फाकिर यांच्या गझलांचे गायन नंंतर जगजित यांनी अनेकदा केले. रसिकांनी त्या गझला ऐकल्या असतीलच. त्यापैकी एक नज्म तर कुणी ऐकली नाही असं कधी होणार नाही…



मुहल्ले की सबसे पुरानी निशानी
वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी
वो नानी की बातों में परियों का डेरा
वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा
भुलाए नहीं भूल सकता है कोई
वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी

कसाबसा जगजित ग्रॅज्युएट झाला. मग घरातून अधिकारी बनण्याचा दबाव वाढला. त्यामुळे एम.ए. इतिहास विषयात करण्याचा इरादा पक्का केला आणि कुरुक्षेत्र विद्यापीठात प्रवेश घेतला. दोन वर्षे कशीबशी काढली. मन काही रमत नव्हतं. जगजितने एकदा तर मनात खूणगाठ बांधली, की संगीतच आपलं आयुष्य आहे. तो 1961 चा काळ होता. एक दिवस त्यांना शिमल्यातील एका कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. त्या वेळी त्यांचे गाणे ऐकले लोकप्रिय अभिनेता ओम प्रकाश यांनी. त्यांनी त्याला मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. जगजितला तर आकाश चार बोटेच राहिली जणू. एवढा मोठा अभिनेता मुंबईला बोलवतोय म्हंटल्यावर जगजितने शिक्षणच सोडून दिले आणि दाखल झाले मुंबईत. घरी कोणालाही सांगितले नाही. मुंबईत ते अभिनेता ओम प्रकाश यांना भेटले. त्यांनी मदतही केली. मदन मोहन, जयदेव आणि शंकर जयकिसन यांची भेट घालून दिली. पुन्हा एकदा जगजित यांना स्वरपरीक्षणाला सामोरे जावे लागले; पण तिथे जगजितची डाळ काही शिजली नाही. एक खडकू खिशात राहिलं नाही. वडिलांना पैशांसाठी तार केली; पण पत्ता लिहिणेच विसरले. अखेर पराभूत मनाने ट्रेनच्या शौचालयात लपून ते विनातिकीट प्रवास करीत जालंधरमध्ये परतले. मात्र, मन अजूनही मुंबईच्या मायानगरीतच अडकलं होतं. दिवस-रात्र मुंबईचे स्वप्न पडायचे. कशीबशी तीन- चार वर्षे काढली आणि हे महाशय पुन्हा मुंबईत आले. या वेळी त्यांना नशीबही साथ देत होते. मायानगरी कोणावरही मेहेरबान होत नाही. ती त्यालाच प्रसन्न होते, ज्याच्या आत काही तरी आहे. या वेळी जगजित झोळी भरून घेऊन गेले आपल्या कौशल्याच्या जोरावर.

(क्रमशः)

Comments

Mahesh Pathade thank you so much
Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.