Kheliyad

Advertisement
Diwali Spacial 2019

Jagmohan to Jagjit singh (part 3) : कुणासाठी त्यांनी पगडी-दाढीपासून मुक्ती घेतली?

October 30, 2019 · · comments


jagjit singh ghazals
Jagjit Singh life story


kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

वडील निवृत्त झाले होते. संपूर्ण कुटुंब लुधियानात येऊन राहू लागलं. घरची परिस्थिती खालावत चालली होती. अशा परिस्थितीत वडिलांकडून काय मागणार...? या वेळी हरदमनसिंग भोगल जणू काही देवदूत म्हणून आले. भोगल सायकलींचा व्यापार करीत होते. ते म्हणाले, "जगजित तू तुझे स्वप्न पूर्ण कर. दर महिन्याला मनीऑर्डर मी पाठवेन. पैशांमुळे तुला परत यावं लागणार नाही. बस तू तुझं कौशल्य दाखव."


या दिलाशाने जगजितच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. ते मनात म्हणाले, "आयुष्यात कोणीच देव पाहिला नाही, पण देवाचे रूप असेल तर ते भोगलमध्ये आहे." पुन्हा एकदा जगजितने कोणालाही न सांंगता पठाणकोट एक्स्प्रेस पकडली. 19 मार्च 1965 चा तो दिवस होता. ही गाडी तीन दिवसांनी मुंबईला पोहोचायची. मुंबईत पोहोचल्यानंतर हरदमनने सहा-सात महिने 200 रुपये प्रतिमहिना पाठवले. घरात कोणालाच माहीत नव्हतं, की या वेळी गेलेला जगजित खरोखर जगाला जिंकण्यासाठी गेला आहे. घरच्यांना कोणालाच जगजित कुठे गेला हे माहीत नव्हतं. फक्त हरदमनला माहीत होत. अखेर महिनाभरानंंतर जगजितची चिठ्ठी आल्यावर घरच्यांना कळलं, की जगजित मुंबईला गेला आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठात होस्टेलमध्ये राहत असताना जगजित दर आठवड्याला शनिवारी- रविवारी घरी यायचा आणि सोमवारी परत होस्टेलवर परतायचा. नंतर तीन आठवडे झाले तरी जगजित घरी आला नाही, म्हणून वडिलांनी दुसऱ्या मुलाला सांगितले, की त्या भोगलला विचार बरं, का आला नाही जगजित? भोगलला विचारले तर त्याने सांगितले, की अरे, तो तर मुंबईला गेला आहे. त्याने कोणाला सांगायला लावले नाही. तूही कोणाला सांगू नकोस. भावाने कोणाला सांगितले नाही आणि महिनाभरानंतर जगजितची चिठ्ठी आल्यानंतर नेमका काय तो उलगडा झालाच.

सुरुवातीच्या काळात जगजित मुंबईत एल्फिन्स्टन रोडवरील गोप हाऊसमध्ये राहत होता. त्या वेळी ते खूपच स्वस्त होतं. रोज सकाळी चर्चगेटसाठी लोकल पकडावी लागायची. दिवसभर इकडेतिकडे धावपळ सुरू असायची. थकूनभागून आल्यानंतर रात्री अंथरुणावर अंग टाकून द्यायचं, असा त्याचा नित्यक्रम. काही दिवसांनंतर गोप हाऊसमधूनही एक प्रकारे जगजितची हकालपट्टीच झाली. गरिबाचा कोणी वाली नसतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय आला.

एकदा रूमवर जगजित परतला तर सामान बाहेर पडलेलं. जगजित चकित झाला. अरे हे काय झालं? त्याने त्याच्या पार्टनरचा शोध घेतला, तर त्याचा रूम पार्टनर रात्री साडेदहा वाजता आला.

जगजित म्हणाला, "अरे माझं सामान बाहेर कसं काय?"

तर तो म्हणाला, "सामान तर माझंही बाहेर आहे. मी तुझ्यासाठी इथं आलोय. मी ही रूम सोडलीय." मग जगजितला कळलं, की तोही एक भाडेकरू होता, ज्याने आपल्यालाच पोटभाडेकरू म्हणून ठेवलं; पण मूळ मालक वेगळाच होता!

नंतर जगजितसह तो आग्रीपाडा भागातील शेर-ए-पंजाब होस्टेलमध्ये राहायला आला. त्या वेळी 35 रुपये भाडे होते. दोघांनी मिळून ते भरण्याचा निर्णय घेतला. नंतर तोही दुसरीकडे निघून गेला. कारण तो नोकरी करीत होता. जगजित मात्र आणखी दोन-तीन वर्षे तिथेच राहिला. तेथे सुविधा अशा होत्या, की कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नव्हती. चहा मागवायचा असेल, तर वरतूनच आवाज द्यायचा, "अरे दो कप चाय भेज.." चहा यायचा. थाली भेज, तर थाळी यायची. कदाचित ताजमध्ये वेळ लागेल, पण शेर-ए-पंजाबमध्ये पटापट सर्व्हिस मिळायची. याच दिवसांत जगजितला भेटले सुभाष घई. सुभाषला हिरो बनायचे होते, तर जगजितला गायक. दोघेही स्वप्नांचे गाठाेडे उराशी घेऊन फिरत होते. सुभाष घईंना अजूनही हा संघर्षमय प्रवास आठवत असेल.

सुभाष घई जगजितसिंग यांना पंजाब विद्यापीठापासून ओळखत होते. पंजाब विद्यापीठात सुभाषची अभिनयकला लोकप्रिय होती. त्या वेळी जगजित डीएव्ही कॉलेजकडून शास्त्रीय संगीत स्पर्धेसाठी यायचा. त्या वेळी जगजितने अनेक पुरस्कार जिंकले होते. तिथूनच सुभाष आणि जगजितच्या मैत्रीचे धागे घट्ट झाले. त्यानंतर अचानक सुभाष मुंबईत जगजितला भेटला. सुभाष चकित. जगजितला म्हणाला, "अरे तू इथे कसा?""

"मी गायक बनण्यासाठी इथे आलोय." - जगजितसिंग

"अरे वाह, मीही इथं अभिनेता बनण्यासाठी आलोय." - सुभाष

मग काय, निघाले दोघे संघर्षाचा अध्याय रचायला. कालांतराने हे दोघे आठवड्यातून दोनदा मरीनलाइन्स, मरीनड्राइव्हला भेटू लागले. दोघेही आपल्या दुखभऱ्या कहाण्या सांगत होते.

तेथे जगजितला आणखी एक देवदूत लाभला. ते म्हणजे बेरी हॉटेलचे मालक बेरी. तरुणांचे ते मदतगार. बऱ्याचदा मोफत जेवण द्यायचे, चहा पाजायचे आणि जगजितसाठी संधीही शोधायचे. आजच्या जमान्यात असे लोक कुठे मिळतात हो.. त्यांनी काही हॉटेलांमध्ये व काही मैफलींमध्ये गायनाची संधी दिली. पैसेबैसे काही मिळत नव्हते, पण रात्रीचं जेवण मिळायचं आणि काही मोठी लोकं जगजित यांचं गाणं ऐकायचे. जगजितला वाटायचं, की कदाचित कुणाला तरी गाणं आवडो आणि लॉटरी लागो. जगजित हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाणे गायचा, पंजाबी टप्पे आणि मागणीप्रमाणे गीतेही सादर करायचे. अगदी श्रीमंतांच्या पार्टीतही ते गाणे गाण्यासाठी जायचे. चार पैसे तरी मिळायचे. लोकं जगजितच्या गाण्यावर अक्षरशः थिरकायचे. जगजित बिझी झाला, पण दिल्ली अजूनही दूर होती.

त्या काळात जगजितने थ्री पिस सूट शिवला होता. तो परिधान करून रोज गाणे गायचे. या आठवणी ते महेश भटसोबत शेअर करायचे. महेश भट प्रोत्साहनही द्यायचे. महेश भट म्हणायचे, जगजित, त्या काळात मैफिलींमध्ये गायचे. थोडे फार पैसे मिळायचे. त्यात त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. ते मला म्हणायचे, की मी मुंडण सेरेमनीतही गायचो!

सुभाष घई तर अॅक्टिंग करण्यासाठी आले होते; पण अॅक्टिंगचा रोल मिळाला जगजितसिंग यांना. त्या वेळी 1967 मध्ये "अमन" नावाचा चित्रपट आला होता. त्यात हिरो होते राजेंद्र कुमार. या चित्रपटात त्यांचा एक सरदार दोस्त होता. तो सरदार दोस्त म्हणजे जगजितसिंग. नंतर जेव्हा कधी जगजितसिंग स्वतःची अॅक्टिंग पाहतात तेव्हा त्यांना हसू आवरत नसायचं. मनात म्हणायचे, बरं झालो अॅक्टर झालो नाही ते. या चित्रपटात जगजितसिंग राजेंद्र कुमारला "ओ जियो पापेजी" असे ओरडत त्याला उचलून घेतो आणि थोडासा संवाद आहे…

जगजितसिंग यांची गाडी हळूहळू दौडायला लागली होती. नव्या गायकांमध्ये लोक जगजित यांच्या नावाची चर्चाही करू लागले होते. त्यांना ते छान वाटायचं; पण आतून बेचैन व्हायचे. कधी ब्रेक मिळेल, याची चिंता त्यांना सतावत होती.

jagjit singh gazalas
जगमोहन ते जगजितसिंग ः एक समृद्ध प्रवास... (Part 3)


एक दिवस अशीच काहीशी सुरुवात झाली. 1966 मध्ये एचएमव्ही कंपनीचे आमंत्रण मिळाले. त्या काळात गाण्यांचे रेकॉर्ड निघायचे. त्याला काळा तवा म्हणायचे. कंपनीने सांगितले, की आम्ही तुझ्या दोन गझलांची ईपी काढू. ईपीमध्ये एका बाजूने किमान दहा मिनिटे रेकॉर्डिंग व्हायचे. म्हणजे दोन गझला. रेकॉर्डिंग झाले. त्यांनी कव्हरवर छापण्यासाठी त्यांना जगजितसिंग यांचा एक फोटो हवा होता. सगळ्यांनी सांगितलं, की पगडी, संगीत आणि दाढी यात मोठा विरोधाभास आहे. जर तू सफाचट झाला तर अधिक चांगलं वाटेल. आता ही गोष्ट जगजित वडिलांना तर सांगू शकत नव्हते; पण मोठ्या भावाला माफी मागून चिठ्ठी लिहिली, की "आता मी शीखरूपात तुम्हाला दिसणार नाही" 9 जानेवारी 1966 रोजी हे अंतर्देशीय पत्र लिहिले होते. त्यात लिहिले होते, मी आता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे. इथले लोक शीख व्यक्तीला आर्टिस्ट म्हणून स्वीकार करीत नाहीत. त्यामुळे पगडी-दाढीपासून मुक्ती आवश्यक आहे.

जेव्हा जगजितसिंग नव्या रूपात आले तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला पुन्हा एक अंतर्देशीय पत्र लिहिलं. त्यात लिहिले, की मी माझी चूक मान्य केली. वडील तर खूप दिवस जगजितसिंग यांच्यावर नाराज होते. त्यांनी तर बोलणेच सोडले होते. जगजित यांचे मोठे भाऊ जसवंतसिंग यांनी ही आठवण सांगितली.

"वडील लोकांना सांगायचे, की आपण एक चांगला शीख बनून राहायला हवं. शब्दकीर्तन, गुरूग्रंथमध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. शीख धर्म सोडला नाही पाहिजे. हे ते दुसऱ्यांना सांगायचे. नंतर त्यांना कळलं, की आपल्याच मुलाने बट्टा लावला तर ते तीन दिवस घरातून बाहेर निघाले नाही. त्यांना वाटायचं, की लोक काय म्हणतील? पण नोकरी होती म्हणून येणं-जाणं तर होणारच होतं. बाहेर पडायलाच हवं. जे काही झालं ते त्यांनी स्वीकारलं, पण सद्मा तर मोठा बसला होता"

जेव्हा जगजितसिंग यांचा चेहरा रेकॉर्डवर प्रसिद्ध झाला तेव्हा लोकांनी ओळखलंच नाही. फेब्रुवारी 1966 मध्ये हा रेकॉर्ड मार्केटमध्ये आला. तो इतका हिट झाला, की त्याच्या पाच हजार प्रती विकल्या गेल्या. एचएमव्हीवाले तर थक्क झाले. त्यात जगजितसिंग यांनी एक गझल मुकेशची कॉपी करून गायिली, तर दुसरी स्वतःच्या खास शैलीत.

अपना गम भूल गये
तेरी जफा भूल गये
हम तो हर बात
मोहब्बत के सिवा भूल गये

ही या रेकॉर्डमधील पहिली गझलस जी मुकेशच्या शैलीत गायली. दुसरी गझल खास जगजितसिंगह यांनी यांच्या शैलीत होती, ती गझल होती...

आंख को जाम समझ बैठा था अंजाने में
साकिया होश कहा था तेरे दिवाने में…

ही रेकॉर्ड विकली गेल्याने जगजितसिंग यांची बल्ले बल्ले झाली; पण संभ्रम हा होता, की कोणामुळे ही रेकॉर्ड विकली गेली? कारण त्याच्या दुसऱ्या बाजूला सुरेश राजवंशीच्याही आवाजातील दोन गझला होत्या; पण यामुळे जगजितसिंग यांना एक फायदा झाला, की या मायानगरीत आता ते अनोळखी राहिले नाहीत. याच काळात जगजित यांना रेडिओ सिलॉनवाल्यांनी रेकॉर्ड केले. त्या काळात रेडिओ सिलॉनमध्ये संधी मिळणे खूप मोठी गोष्ट होती. जगजितसिंग यांचं 5 फेब्रुवारी 1966 च्या रात्री आठ वाजता फुलवारीमध्ये पहिल्यांदाच गाणं लागलं होतं.

(रेडिओ सिलॉनची एक टॅगलाइन वाजायची. 60 च्या दशकातील पिढीला ती चांगली ठाऊक असेल...
आपका पुराना साथी रेडिओ सिलॉन…)


(क्रमशः)

Next 4 th part here...


असा मिळाला जगजितसिंग यांना पहिला ब्रेक!


Comments

Unknown जगजीत सिंग यांच्या जिवनातील चढ उतार अतिशय सुरेख रितीने मांडलेले आहेत. खुप खुप छान.
Mahesh Pathade thank you so much
Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.