साठच्या दशकातील जळगावची खो-खोपटू: रजनी पवार ते निर्मला पाटील - ऊन, वहाणा आणि बंडखोरीची कहाणी
दुपारचे टळटळीत ऊन. सहावारी साडीत एक तरुणी कॉलेजात जाते. समोरून एखादा दादला दिसला, की पोरीनं पायातल्या वहाणा हातात घ्यायच्या. तुम्ही पेचात पडला असाल - पोर किती आक्रमक! पण तसलं काही नाही हं. तो साठच्या दशकातला एक खराखुरा कल्चरल शॉक आहे. जळगावच्या ग्रामीण भागात पूर्वी ज्येष्ठ पुरुष कोणी समोरून दिसला, तर मुलींना वहाणा हातात घेऊन पदर डोक्यावर घेत पाठमोरं उभं राहायचं. वाह! किती ही भयंकर नम्रता! की तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीचा धाक म्हणावा?
डोक्यावर सूर्य आग ओकतोय, रस्ते भाजून काढतोय. जळगावचं ऊन म्हंटलं म्हणजे तुम्हाला एसीतही चटके बसले असतील. अशा वेळी त्या मुलीची अवस्था काय असेल? असो. पण ती त्या काळची एक अदबीची संस्कृती होती म्हणे. ही जळगावातल्या साठच्या दशकातली गोष्ट आजच्या पिढीला दंतकथा वाटेल; पण असं होतं बुवा! तुम्हाला बसला तसा मलाही हा कल्चरल शॉक बसला.
साठ-सत्तरच्या दशकात ‘तरुणपण सोसलेल्या’ अशाच एका आजींशी संवाद साधण्याचा योग आला. होय, तरुणपण सोसलेल्या आजी. तारुण्य सोसणं म्हणजे काय असतं, ते साठच्या दशकातील महिलांची पिढीच सांगू शकेल. तारुण्यात पाऊल ठेवलं, की मुलीवर नाना बंधने. शर्ट-पँट घातलेली मुलगी त्या काळात वाह्यात, वाया गेलेली समजली जायची. महिलांना स्वतःचं विश्व अजिबातच नव्हतं. आजही ते पूर्णपणे आहे का, शंकाच आहे. कपड्यांवरून आजही मुलींना हिणवले जाते. वखवखलेल्या नजरा लचके तोडतात. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ही स्थिती. आता तुम्ही साठच्या दशकातली स्थिती काय असू शकेल याची कल्पना केली, तर अंगाला काटा येईल. अर्थात, तेही महिलांनी सहजपणे स्वीकारलं. ती जाचक बंधने इतकी अंगवळणी पडली, की त्यांना फॅशनेबल कपडे वापरण्याची मुभा दिली असती, तरी त्या तोंड वेंगाडत झिडकाल्या असत्या.
आता याच आजींचं बघा. वय त्र्याहत्तराच्या पलीकडे गेलेले. दोन्ही मुले अब्रॉड - लंडननिवासी. लेकांना भेटण्यासाठी कधी कधी त्या एकट्या लंडनला जातात. तीन-सहा महिने मुक्कामी राहतात. कधी कधी सुना त्यांना घ्यायला येतात. सगळं काही छान. फार नशीबवान बाई. त्या मूळच्या जळगावच्या. लग्नानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. सुरुवातीला १९७१-७४ दरम्यान महर्षी शिंदे डीएड कॉलेजला शिक्षिका, नंतर नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वीस वर्षे. त्यानंतर नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये १९९४-९७ दरम्यान शिक्षिका, मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात १९९७ ते २००२ दरम्यान उपमुख्याध्यापकपदाची धुरा वाहिली आणि पांढर्लीच्या जनता विद्यालयात एक वर्ष मुख्याध्यापकपदाची जबाबदारी पार पाडून त्या निवृत्त झाल्या. आता नाशिकमध्ये पाच खोल्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. सोबतीला हलकासा पार्किन्सन असतो. त्यांना कधी भास होतो.
भल्यामोठ्या फ्लॅटमध्ये एकट्याच असताना एकदा त्यांना दिंडीचा भास झाला. घरात वारकरी आले. अंगणात टाळ-मृदंगाचा निनाद. डोळे उघडले तर फेटे घातलेले, हातात भगवे झेंडे, कुणाच्या हातात तुळस, कुणाच्या हातात तंबोरा. मोठ्याने अभंग गात बसलेले वारकरी पाहून त्या अचंबित झाल्या. हा सगळा सोहळा जणू काही त्या याचि देही याचि डोळा अनुभवत होत्या. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. तो एक भास होता. असा भास त्यांना नेहमीच होतो, तोही भयाण रात्री. घरात कोणी नसताना असे भास काय कयामत आणत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. हा दिंडीचा भास होता म्हणून कदाचित त्यांना छान वाटले असेल, पण भुताखेतांचा भास झाला तर… बापरे!
असे असले तरी त्यांना हा एकटेपणा सवयीचा झाला आहे. वर्षातला सहा महिन्यांचा व्हिसा मुलांकडे घेऊन जातो. उर्वरित सहा महिने एकटेपणा. सोबतीला अंगणातील आंबा, जंगली तुळस वगैरे झाडं. बाकी माझ्यासारखा धूमकेतूसारखा कधीतरी भेटतो. त्यांना तेवढंच बरं वाटतं. नाशिकशी त्यांचे छान ऋणानुबंध जुळले आहेत. त्यामुळे नाशिक त्यांना सोडवत नाही हेही तितकेच खरे.
ही आमची मावशी - पूर्वाश्रमीच्या जळगावच्या रजनी पवार, तर आताच्या नाशिकमधील निर्मला पाटील. निर्मला पाटलांशी नंतर बोलू. आधी पूर्वाश्रमीच्या रजनी पवार यांच्याशी संवाद साधू. या रजनी पवार म्हणजे साठच्या दशकातील विद्यापीठ स्तरावरील खो-खोपटू.
जळगावच्या आजच्या पिढीला कदाचित रजनी पवार माहीत नसतील. साठच्या दशकातील पिढीलाही त्या ज्ञात असतील की नाही, माहीत नाही. त्या स्वतःच त्याबद्दल साशंकता बाळगतात. पण त्यांचे वडील नानासाहेब एस. एस. पाटील यांना कोणी विसरले नसेल. आजच्या पिढीकडून अपेक्षा नाही; पण साठच्या दशकातील अनेकांना ते माहीत असतील. नूतन मराठा कॉलेजचे मुख्याध्यापक, पुणे विद्यापीठाचे (त्या काळी पुणे विद्यापीठांतर्गतच जळगाव होते) विधिसभा असेंब्लीचे सदस्य, एसएससी बोर्डाचे संचालक आणि पाठ्यपुस्तक मंडळावरही ते होते. १९७७ मध्ये ते नूतन मराठातून निवृत्त झाले. प्रचंड हुशार आणि आधुनिक विचारसरणीचं हे व्यक्तिमत्त्व. त्यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे रजनी पवार.
जळगाव आता खूपच बदललं. साठच्या दशकातल्या काही खुणा आजही असतील, पण त्या वेळी पवार कुटुंब चिमुकले राममंदिरामागे यशोदा निवासात भाड्याने राहायचे. तीन खोल्यांच्या घराचं भाडं साठ रुपये प्रतिमहिना. १९६९ पूर्वीचा हा काळ. मोठी ओढाताण करून वडिलांनी जळगाव जिल्हा बँकेसमोर (जेडीसीसी) पाचशे रुपयांचा चार-पाच हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेतला. रजनी पवार यांच्या विवाहासाठी त्यातील अर्धा विकावा लागला. अर्ध्या जागेवर नंतर त्यांनी ‘सुगी’ नावाचा बंगला बांधला. तो वेळी शिक्षकवाडीत होता. आता बरीच वस्ती वाढली आहे. सत्तरच्या दशकात जळगावात प्लॉटचा व्यवसाय जोरात होता. आता किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
रजनी पवार यांचं शिक्षण एम. जे. कॉलेजमध्येच झालं. त्यांचा पट उलगडता उलगडता अनाहूतपणे जळगावातील साठच्या दशकातील युगाचा प्रवास उलगडत जातो. महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ १९६२ ते ६६. या काळात त्यांनी काय नाही पाहिलं – गोवा मुक्तिसंग्राम, भारत-चीन युद्धाची धग, भारत-पाकिस्तान युद्धाचे पडसाद. एक चालताबोलता संदर्भग्रंथ, ज्याची पाने आता जीर्णशीर्ण झाली आहेत. आठवणींचे शब्द धूसर होत आहेत. तुकड्या तुकड्यांनी त्या आठवत होत्या आणि मी फाटलेल्या पानाचे चिटोरे जोडत क्रम लावण्याचा फाटका प्रयत्न करीत होतो.
एम. जे. कॉलेजमध्ये म. मो. केळकर नावाचे शिक्षक होते. ते इतिहास की इंडियन कल्चर शिकवायचे. मराठीही छान होतं. रजनी पवार पुणे विद्यापीठ खेळलेल्या जळगावातील त्या काळातील एकमेव महिला खो-खोपटू. त्यांना आता तो संघ, ते सामने अजिबात आठवत नाहीत; पण निवड कशी झाली ते आठवतं. त्या काळी पुणे विद्यापीठाचा पसारा इतका मोठा होता, की कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठही अस्तित्वात नव्हतं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तर आजच्या पिढीचं. अशा काळात एक तरुणी खो-खो खेळायची हेच मोठं अप्रूप. वडिलांचे प्रोत्साहन होते म्हणून त्या खेळू शकल्या. आईला अजिबात आवडत नव्हतं. पण वडिलांपुढे त्यांचं काही चाललं नाही. पीटी डायरेक्टर म्हणून जाधव सर होते (पूर्ण नाव आठवत नाही). जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक या नॉर्थ ग्रुपसाठी त्यांची निवड झाली. साऊथ ग्रुपमध्ये कोल्हापूर-सोलापूर, पूना ग्रुपमध्ये पुणे. नॉर्थ ग्रुपचे सामने नाशिकमध्ये झाले. ही १९६२ ची गोष्ट. जळगावातून रजनी पवार, सुमन ओक, धुळ्यातून एक मुलगी. आता त्या मुलीचं नाव आठवत नाही. कॉलेज संपलं की मुली मरेपर्यंत एकमेकींना भेटत नाहीत. दूरध्वनी कार्यालयांपुरते मर्यादित होते. वैयक्तिक दूरध्वनी खूपच ऐश्वर्यसंपन्न घरांची शोभा असायची. त्यामुळे मैत्रिणी महाविद्यालयापुरत्याच राहिल्या. नॉर्थ ग्रुपमधूनही निवड होऊन त्या पुण्यात पुढची स्पर्धा खेळल्या. हे ऐकून मी थक्क झालो. टीव्ही, मोबाइल असले चोचले नव्हतेच. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा. वहाणा हातात घेऊन पाठमोऱ्या उभ्या राहणाऱ्या मुलींच्या काळात विद्यापीठ खेळणं सगळंच थक्क करणारं.
“अरे हो, वहाणा हातात घेण्याच्या प्रथेबद्दल आठवलं…” असं म्हणत त्या लगेच पुढे म्हणायच्या, “मी नाही कधी हातात वहाणा घेतल्या. मला ते मान्यच नव्हतं. कारण टळटळीत उन्हात कोण पाय भाजून घेईल? कोणी काहीही म्हणो, मी कधी त्याची पर्वा केली नाही.” त्यांनी बंडखोर वृत्तीची चुणूक दाखवून दिली. मग पटलं - खरंच त्या उत्तम खेळाडू होत्या. खेळाडूत असलं बंड नसेल तर कोणात असेल?
पुण्याला खेळायला जाताना ट्रेनशिवाय पर्याय नव्हता. बस नव्हत्या. गोवा मुक्तिसंग्रामाचे वारे वाहताना जाणवले. सैन्याने भरलेल्या ट्रेन आधी सोडल्या जायच्या. त्यामुळे मनमाड, दौंडला त्यांची ट्रेन अनेक तास रोखून धरलेली होती.
रजनी पवार खूपच अॅक्टिव्ह होत्या. पीटी लीडर आणि कॉलेजमध्ये एलआर म्हणून निवडून आल्या होत्या. जिमखान्याच्या मंडळातही सक्रिय. उत्तम खो-खोपटू म्हणून कॉलेजमध्ये लौकिक. वडील नूतन मराठाचे मुख्याध्यापक असल्याने शिक्षकांना कौतुक होतंच. त्याच काळात देवकीनंदन सारस्वत, सुरेश जैन, रमेश जैन शिकायला होते. रमेश जैन कॉलेजचे जीएस होते. मगन बंडू पाटील व जगन बंडू पाटीलही सोबत. हे दोघे खोडकर. त्यांचे वडील बंडू पाटील चांगले शिक्षक, स्कॉलरशिपचा क्लास घ्यायचे.
रजनी यांना कॉलेजमधील एका मुलीचं नाव चांगलंच लक्षात आहे - एफवाय बीएस्सीची शैलजा पवार. ही मुलगी कॉलेजात फेमस होती. शैलजा म्हणजे जळगावातील पोस्ट ऑफिसरची मुलगी. त्या मॉडर्न राहायच्या. ‘हम दोनो’ चित्रपट कमालीचा हिट होता. मेजर वर्मा यांच्या पायातले बूट जसे टॉक-टॉक आवाज करायचे, तसे बूट शैलजा यांच्या पायात असायचे. कॉलेजमधून चालताना त्या बुटांचा टॉक-टॉक आवाज अनेकांचे लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्याविषयी कुजबूज झाली की “कोण या पवार?” तर “टॉक-टॉक बूटवाल्या पवार”; खो-खोवाल्या पवार नाही. अशी ही दोन पवारांची ओळख दोन वेगवेगळ्या कारणांनी कॉलेजात होती.
रजनी पवार कला शाखेच्या विद्यार्थिनी. भावे नावाचे शिक्षक (पूर्ण नाव आठवत नाही) पीडीला इकॉनॉमिक्स शिकवायचे. पीडी म्हणजे प्री-डिग्री. अकरावीनंतर प्री-डिग्रीला अॅडमिशन. अकरावी म्हणजे आजची मॅट्रिक, पीडी म्हणजे आजची अकरावी. चारशे मार्कांचा एका विषयाचा पेपर. आता ऐकलं तरी अंगाला काटा येतो. इंग्रजीला थॉमस हार्डीची Two on a Tower कादंबरी (१८८२ मध्ये लिहिलेली). Patterns of Prose, आल्फ्रेड टेनिसनची The Golden Treasury, शेक्सपिअरचं The Merchant of Venice, Civilization of Science... दोन पुस्तके दोनशे मार्कांची, चार पुस्तके चारशे मार्कांची. बापरे! केवढा हा अभ्यास!
एटीकेटी (Allowed To Keep Terms) ची सुरुवात १९६२-६३ मध्ये झाली आणि त्याच्या पहिल्या बॅचच्या शिलेदार रजनी पवार. कॉलेज म्हणजे धम्माल-मस्ती. पेपरमध्ये नापास होण्याचं प्रमाण बरंच. चारशे मार्कांचे पेपर लिहायचे म्हणजे पेनात शाई असून चालत नाही, डोक्याची कलई झालेली असावी लागते. मुलांपेक्षा मुलींचं शिक्षण खूप खडतर. घरचं कामही करायचं आणि शिक्षणही घ्यायचं. रजनी यांच्यापुढे एवढीच एक अडचण नव्हती. आईचं आजारपण वाढलं आणि सगळी धुरा त्यांच्यावर येऊन पडली. सर्व मिळून नऊ भावंडे - पाच भाऊ आणि तीन बहिणी. घरच्या कामामुळे कॉलेजला दांडी मारली. वर्षही वाया गेलं.
एम. जे. कॉलेजचं दरवर्षी ‘अजिंठा’ नावाने मासिक प्रसिद्ध व्हायचं. या मासिकात पहिल्यांदाच त्यांनी कवी भूषण यांच्यावर लेख लिहिला. हे त्यांचे आवडते हिंदी कवी. गारूड इतकं होतं, की पहिल्या मुलाचं नावही भूषण ठेवलं. मराठीचे प्राध्यापक राजा महाजन एक दिलदार व्यक्तिमत्त्व. महाजन यांच्या भावाची एक कथा प्रसिद्ध झाली होती – ‘मना भाऊ डू मातला मासा’. डूमातला म्हणजे डोहातला. भाऊ डोहात बुडून गेला त्यावर बहिणीने दिलेली उपमा. शोकांतिका आणि बहिणीची भावाविषयीची अगतिकता.
रजनी पवार यांचे वडील पुणे विद्यापीठाचे विधीसभा सदस्य असल्याने त्यांचा मोठा अभ्यासू मित्रपरिवार होता. त्यातील एक - विद्यापीठाच्या मानसशास्त्राचे डीन गजानन जोशी. वाराणसीत मानसशास्त्राच्या परिषदांना जाणे-येणे असायचे. त्या वेळी बलराज साहनीही हजेरी लावायचे. बलराज साहनी जुन्या काळचे चित्रपट कलाकार म्हणून परिचित असतील; पण ते मानसशास्त्राचे तज्ज्ञही होते हे आजच कळलं.
साधारण १९६९ च्या दरम्यान पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ह. वि. पाटसकर होते. एमजे कॉलेजचे प्राचार्य वाय. एस. महाजन, उपप्राचार्य सी. आर. पोतनीस. पोतनीस यांच्या पत्नी नूतन मराठामध्येच शिक्षिका होत्या. त्याच शाळेत नंतर रजनी पवार शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तीन वर्षे नोकरी केली. लग्नानंतर ही नोकरी सोडावी लागली.
जळगावात आज अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. अत्रे यांचा जसा लौकिक आहे, तसाच एके काळी चित्रे वकिलांचा महाराष्ट्रात लौकिक होता. नटवर टॉकीजजवळ दोन-तीन मजली लाकडी माडीचं घर. नांदेड साळवे येथील मोठा गाजलेला खटला त्यांनी लढला होता. रजनी हातेडमध्ये शाळेत शिकत असताना चित्रे यांची दोन-तीन नंबरची मुलगी शिकवायला होती. त्यांच्यामुळेच रजनी यांचं मराठी सुधारलं. ‘पुपा’ (पुरुषोत्तम पाटील)ही तेथेच शिकवायचे. रजनी पवार यांची आत्या ‘पुपां’ची चुलतवहिनी. हातेडमध्ये रजनी यांचे वडील १९५४ ते ६० पर्यंत मुख्याध्यापक होते. या शाळेची मुहूर्तमेढच मुळी त्यांच्या वडिलांमुळे झाली. ‘पुपा’ नंतर धुळ्याला गेले.
ही कहाणी फक्त एका स्त्रीची नाही. ही साठच्या दशकातील जळगावाची, उत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक बदलांची आणि पुरुषप्रधान संस्कृतीला झुगारून शिक्षण व खेळात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या एका बंडखोर मुलीची कहाणी आहे. आजच्या पिढीला वहाणा हातात घेण्याची प्रथा दंतकथा वाटेल, पण त्या काळात ती वास्तव होती. आणि त्या वास्तवातही रजनी पवार सारख्या मुलींनी आपली वाट स्वतः काढली. त्यांच्या आठवणी आजही प्रेरणा देतात - की बंडखोरी हीच खरी नम्रता असते, जेव्हा ती स्वाभिमानाच्या बाजूने उभी राहते.
.png)
Comments