Kheliyad

Advertisement
All Sports

सिडनी स्वीनीच्या जाहिरातीवरून वाद का? महिला खेळाडूंनी घेतले आक्षेप

October 23, 2026 · · comments

सिडनी स्वीनीच्या जाहिरातीवरून वाद का? महिला खेळाडूंनी घेतले आक्षेप

अभिनेत्री सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. तिने आपला नग्न देह क्रीडा साहित्यांनी ढकलेला असल्याचे एक पोस्टर वादग्रस्त ठरले आहे. एका स्पोर्ट्स ब्रँडसाठी दिलेल्या बोल्ड दृश्यांवरून अनेक महिला खेळाडूंनी आक्षेप घेत टीकास्त्र सोडले आहे. खेळातील महिलांच्या प्रतिमेवर यामुळे खरंच परिणाम झाला का, किंवा अशी बोल्ड दृश्ये महिला खेळाडूंनी दिली नाही का, असे प्रश्नही या निमित्ताने पुढे आले आहेत. मुळात वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे नेमके आक्षेप काय, जाहिरातीमागील उद्देश यावर टाकलेला प्रकाशझोत. 

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.
Novigच्या जाहिरातीतील सिडनी स्वीनीचे सादरीकरण

नग्नता आणि इंद्रियसुखद संवेदना या दोन भिन्न बाबी आहेत. नग्नता म्हणजे निव्वळ वस्रहीनता, असा साधासिंपल अर्थ. त्यात ना कामुकता असते, ना लैंगिकतेचे आकर्षण. पण संवेदना किंवा सेन्शुअल त्यापेक्षा भिन्न. उदाहरणच द्यायचे तर एखादी रेसिपी माहिती असणे यातून जिभेला चवीची संवेदना होत नाही, पण ही रेसिपी करताना त्यातून मसाल्याचे मिश्रण आणि सुगंध दरवळतो, तेव्हा चवीचा एक सेन्शुअल अनुभव होतो. सेन्शुअलसाठी (इंद्रियसुखद किंवा संवेदना जागृत करणारे) दिलेलं हे उदाहरण मला वाटतं पुरेसं आहे.

तर विषय नेमका विषय काय आहे, तर एका अभिनेत्रीने क्रीडासाहित्याच्या जाहिरातीसाठी दिलेले नग्न दृश्य. ही अभिनेत्री सिडनी स्वीनी. तिच्या जाहिरातीवरून प्रचंड वाद निर्माण झाला. हा वाद केवळ नग्नता किंवा जाहिरातीतील बोल्ड दृश्यांपुरता मर्यादित नाही. त्यामध्ये महिलांच्या शरीराचे व्यावसायिक सादरीकरण, महिला खेळाडूंच्या प्रतिमेचा वापर, लैंगिक आकर्षणावर आधारित मार्केटिंग आणि खेळातील महिलांना मिळणारी वागणूक असे अनेक मुद्दे आहेत.

या प्रकरणाचा अभ्यास करताना तीन गोष्टी वेगळ्या ठेवणे महत्त्वाचे आहे: जाहिरातीत प्रत्यक्ष काय दाखवले, जाहिरात करणाऱ्या कंपनीचा उद्देश काय होता आणि टीकाकारांनी त्यावर कोणते आक्षेप घेतले. एखाद्या जाहिरातीवर टीका झाली म्हणजे ती बेकायदेशीर किंवा सर्व महिलांना आक्षेपार्ह वाटली, असा निष्कर्ष आपोआप काढता येत नाही.

१. नेमकी कोणती जाहिरात होती?

जाहिरात करणारी कंपनी आहे नोव्हिग (Novig), तर या जाहिरातीतील अभिनेत्री आहे सिडनी स्वीनी (Sydney Sweeney). स्पोर्ट्स बेटिंगऐवजी स्पोर्ट्स प्रेडिक्शन मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मची ही जाहिरात होती.

सिडनी स्वीनी जवळजवळ नग्न अवस्थेत दिसते. तिच्या शरीराचे महत्त्वाचे भाग फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी स्टिक, टेनिस रॅकेट आणि इतर खेळांच्या साहित्याने झाकलेले आहेत. ती वेगवेगळ्या खेळांचे अनुकरण करताना दिसते.

ABC News | The Guardian | Euro News

जाहिरातीत स्वीनी वारंवार “Sports” हा शब्द वापरते. त्यातून कंपनीचा संदेश केवळ खेळांवर आधारित अंदाज आणि व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे, असे दाखवले जाते. ती पुढे, “You can't trade this, I just look good here” असे म्हणते. या वाक्याचा साधारण अर्थ, “माझा या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करता येत नाही; मी इथे फक्त चांगली दिसते,” असा होतो. या दृश्यामुळे जाहिरातीचा भर प्रत्यक्ष खेळांवर नाही, तर अभिनेत्रीच्या निव्वळ अंगप्रदर्शनावर असल्याची टीका झाली.

ही जाहिरात आता नाही, तर गेल्या महिन्यात सप्टेंबर २०२६ मध्ये प्रचंड व्हायरल झाली. ती केवळ मनोरंजन किंवा फॅशनची जाहिरात नसून खेळांशी संबंधित व्यावसायिक प्लॅटफॉर्मची जाहिरात होती. अर्थातच यात महिला खेळाडूंच्या भावना दुखावल्या. त्यामुळे महिला खेळाडूंनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला. कारण प्रश्न महिला खेळाडूंच्या प्रतिनिधित्वाचा होता. तशा प्रतिक्रिया उमटणंही स्वाभाविकच होतं.

सिडनी स्वीनीने असे का केले? 

या जाहिरातीतून दोन प्रश्न उपस्थित होतात-  एक म्हणजे सिडनी स्वीनीने असे का केले? दुसरे म्हणजे कंपनीला काय साध्य करायचे होते? दोन्ही प्रश्न तसे गौण आहेत आणि म्हंटलंच तर ते महत्त्वाचेही आहेत. सिडनी स्वीनीने असे का केले? तर त्यामागचं कारण स्पष्ट आहे. पैसा, ग्लॅमरस आणि चर्चेत येणं. या पलीकडे काही असेल तर तिचा वैयक्तिक हेतू आणि जाहिरातीचा व्यावसायिक हेतू वेगळा पाहायला हवा.

दुसरा प्रश्न म्हणजे कंपनीला काय साध्य करायचे होते? Novig या कंपनीला आपल्या ब्रँडची ओळख मोठ्या प्रमाणावर करून द्यायची होती. खेळांशी संबंधित प्लॅटफॉर्मसाठी परिचित आणि चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा वापर केल्याने जाहिरात सोशल मीडियावर वेगाने पसरू शकते.

जाहिरातीमागील संभाव्य व्यावसायिक गणित असे होते:

  1. लक्ष वेधून घेणे : सर्वसाधारण स्पोर्ट्स जाहिरातींपेक्षा वेगळे आणि धक्कादायक दृश्य दाखवणे
  2. व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळवणे : लोकांनी जाहिरात शेअर करणे, त्यावर चर्चा करणे आणि कंपनीचे नाव लक्षात ठेवणे
  3. नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे : अभिनेत्रीच्या लोकप्रियतेचा वापर करून स्पोर्ट्स प्रेडिक्शन प्लॅटफॉर्मकडे लक्ष वेधणे
  4. वादातून प्रसिद्धी मिळणे : जाहिरातीवर टीका झाली तरी कंपनीला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळू शकते

The Guardianच्या वृत्तानुसार, Novigचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब फोर्टिन्स्की यांनी स्वीनी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते आणि त्यामुळे कंपनी चर्चेच्या केंद्रस्थानी येते, असा युक्तिवाद केला. स्वीनी केवळ जाहिरातीतील अभिनेत्री नसून कंपनीची धोरणात्मक भागीदार आणि इक्विटीधारक असल्याचेही वृत्तात नमूद केले आहे.

स्वीनी म्हणते, खेळकरपणातून संदेश!

जाहिरातीच्या संकल्पनेबद्दल स्वीनीने ती आत्मविश्वास, विनोद आणि खेळकरपणा यांद्वारे कंपनीचा संदेश मांडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले, असे Euronews ने वृत्त दिले. मात्र, महिला खेळाडूंनी केलेल्या विशिष्ट आक्षेपांना उत्तर देताना तिच्याकडून सार्वजनिक स्पष्टीकरण आल्याचे उपलब्ध वृत्तांत दिसत नाही. टीकेनंतर तिने ESPNच्या Body Issueमधील नग्न किंवा अर्धनग्न खेळाडूंची छायाचित्रे आपल्या Instagram Storiesवर शेअर केली. त्यामुळे काहींनी याचा अर्थ नग्नता स्वतःमध्ये चुकीची नसते, असा अप्रत्यक्ष प्रतिवाद मानला. 

म्हणूनच, तिने ही जाहिरात केवळ वाद निर्माण करण्यासाठी केली, असे ठामपणे म्हणता येत नाही. व्यावसायिक प्रसिद्धी हा उद्देश स्पष्ट दिसतो; मात्र तिच्या मनातील नेमका हेतू सिद्ध झालेला नाही.

महिला खेळाडूंचे नेमके कोणते आक्षेप?

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.


महत्त्वाचे म्हणजे स्वीनीच्या या जाहिरातीत तिच्या नग्नतेवर सरसकट टीका नाही झाली. मुद्दा होता, खेळातील महिलांना कसे दाखवले जाते याचा.

Ariarne Titmus (जलतरण)

चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या टिटमसने जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, महिला खेळाडूंनी आपले संपूर्ण आयुष्य कौशल्य विकसित करण्यासाठी खर्च केलेले असते; त्यांच्या मेहनतीचे आणि खेळावरील प्रेमाचे अवमूल्यन करून त्यांच्या शरीरातून पैसे कमावणे चुकीचे आहे. 

Amy Hunt (धावपटू)

२०० मीटर शर्यतीत चौथ्या स्थानावर आल्यानंतर एमी हंट हिने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्वीनीला उद्देशून म्हटले, “सिडनी स्वीनी, खेळातील महिला अशा दिसतात.” त्यानंतर तिने स्नायू, मेहनत, घाम, रक्त आणि अश्रू यांचा उल्लेख केला. तिचा मुद्दा असा होता, की खेळाडूंची ओळख त्यांच्या कामगिरीतून असायला हवी.

Gracie Kramer (जिम्नॅस्टिक्स)

ग्रेसी क्रेमर हिने सोशल मीडियावर स्वतःच्या जिम्नॅस्टिक्सचा व्हिडीओ शेअर करून महिला खेळाडू प्रत्यक्षात कशा दिसतात आणि काय करतात, हे दाखवले. आपल्या कारकिर्दीत महिला खेळाडूंना त्यांच्या क्षमतेपेक्षा शरीरावरून अधिक मोजले जात असल्याचा अनुभव तिने मांडला.

Skye Nicolson (बॉक्सिंग)

स्काये निकोल्सन हिने एक महत्त्वाचा फरक स्पष्ट केला: खेळामुळे एखादी महिला आकर्षक दिसणे आणि खेळाची जाहिरात करण्यासाठी लैंगिक आकर्षणाचा वापर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिलांनी स्त्रीत्व जपूनही ताकदवान आणि यशस्वी खेळाडू होण्यात काहीच गैर नाही, असे ती म्हणाली.

याशिवाय ऑस्ट्रेलियन जलतरणपटू लानी पॅलिस्टर, वॉटर पोलो खेळाडू टिली केअर्न्स आणि ऑस्ट्रेलियन हॉकी संघाची गोलरक्षक जॉक बार्ट्रम यांनीही आक्षेप घेतला. त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये महिला खेळाडूंना कौशल्य, सराव आणि यशाच्या आधारे ओळख मिळावी, ही समान भूमिका होती.

कामगिरी महत्त्वाची की दिसणे महत्त्वाचे?

कामगिरीपेक्षा शरीराला महत्त्व आलं, की कामगिरी झाकोळते. मग कर्तृत्ववान महिला हे बिरूद मागे पडतं. विशेषतः महिलांबाबत हे ठळकपणे अनेकदा अशा प्रकारच्या सवंग प्रसिद्धिलोलूप जाहिरातींतून समोर येत असतं. महिला खेळाडूंची वेगवान धाव, ताकद, तंत्र, विक्रम आणि पदके गौण ठरण्याची भीती असल्याने या जाहिरातींवर सजग महिला खेळाडू जेव्हा टीका करतात तेव्हा ते गैर नाही. किंबहुना त्या टीकेचे समर्थनच करायला हवे.

दुसरे म्हणजे महिला खेळाडूंना अनेकदा पुरुष खेळाडूंप्रमाणे गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरावर केंद्रित जाहिरातीमुळे जुन्या पूर्वग्रहांना बळ मिळते. ही भीती अजिबात अनाठायी नाही.

तिसरे म्हणजे मुलींना खेळात यश मिळवण्यासाठी कौशल्य आणि मेहनत आवश्यक आहे, की दिसणे महत्त्वाचे आहे, असा प्रश्न निर्माण होतो. जाहिरातींनी क्षमता आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन द्यायला हवे, हा खेळाडूंचा मुद्दा रास्त आहे.

सध्या प्रत्येक गोष्टी कॅश करण्याचा प्रयत्न होतो. जाहिरातीमुळे अभिनेत्री आणि कंपनीला मोठी प्रसिद्धी मिळते; परंतु महिला खेळाडूंच्या प्रत्यक्ष कामगिरीला तितके महत्त्व मिळतेच असं नाही. या असमानतेवरही प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत.

या वादाला आणखी एक बाजू आहे. काही लोकांच्या मते, ही महिला खेळाडूंची जाहिरात नसून प्रौढ प्रेक्षकांसाठी असलेल्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मची जाहिरात आहे. त्यामुळे त्यातून खेळाडूंचे प्रतिनिधित्व अपेक्षित धरणे योग्य नाही. पण हे मत हास्यास्पद आहे. कारण जेव्हा तुम्ही जाहिरातीत खेळाचे साहित्य आणि क्रीडासंदर्भ वापरतात तेव्हा ती महिला खेळाडूंचेच प्रतिनिधित्व करते हे कसे नाकारता येईल?

अभिनेत्रीचीच चूक आहे का?

या वादात अभिनेत्रीचीच संपूर्ण चूक आहे, असा एकतर्फी निष्कर्ष काढणेही योग्य ठरणार नाही. स्वीनीच्या समर्थनार्थ काही मुद्दे पुढे आले आहेत.

  1. प्रौढ महिलेला स्वतःच्या इच्छेने नग्न किंवा अर्धनग्न फोटोशूट करण्याचा अधिकार असतो. हा हक्क हिरावता येणार नाही. भलेही त्यावर मतमतांतरे असू शकतील. केवळ नग्नता म्हणजे महिलांचा अपमान, असे मानावे का या प्रश्नाचे उत्तर कोण देणार.
  2. कलात्मक छायाचित्रण, अंगप्रदर्शनातील स्वीकारार्हता आणि खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचे वास्तव दाखवणे यासाठीही नग्न छायाचित्रांचा वापर झाला आहे.
  3. स्वीनी व्यावसायिक अभिनेत्री आहे. या जाहिरातीत एखाद्या प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी महिला खेळाडू असल्याचा तिने कुठेही दावा केलेला नाही.
  4. जाहिरातीची संकल्पना, तिची निर्मिती आणि प्रसिद्धी यामध्ये कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे संपूर्ण टीका फक्त अभिनेत्रीवर केंद्रित करणे चुकीचे ठरू शकते.

तरीही, नग्नतेला संमती असणे आणि त्या नग्नतेचा व्यावसायिक संदर्भ योग्य असणे हे दोन स्वतंत्र प्रश्न आहेत. अभिनेत्रीला स्वतःच्या शरीराचे सादरीकरण करण्याचे स्वातंत्र्य असले, तरी त्या सादरीकरणामुळे महिला खेळाडूंबद्दल कोणता संदेश जातो, याचाही साकल्याने विचार व्हायल हवा.

हा वादाचा पहिलाच प्रसंग आहे का?

सिडनी स्वीनीची ही पहिलीच जाहिरात आहे का, जिच्यामुळे वादाचे मोहोळ उठावे, तर नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी, नव्हे महिला खेळाडूंनीही जाहिराती केल्या आहेत आणि त्यात त्यांनी अंगप्रदर्शनही केले आहे. अर्थात, यामागे विषय वेगवेगळे असू शकतात. काहींमध्ये महिलांचे लैंगिकीकरण झाले, काहींमध्ये नग्नतेचा सकारात्मक संदर्भ होता, तर काहींमध्ये महिलांविषयी हिंसक किंवा अपमानास्पद चित्रण केले गेले.

1. GoDaddyच्या Super Bowl जाहिराती आणि डॅनिका पॅट्रिक (२००९-२०१३)

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.


अमेरिकेतील Super Bowl हा फुटबॉलचा सामना जितका प्रसिद्ध आहे, तितक्याच चर्चेत त्याच्या जाहिराती असतात. वेबसाइट डोमेन विकणाऱ्या GoDaddy कंपनीने रेसिंग ड्रायव्हर Danica Patrick हिचा वापर करून अनेक बोल्ड जाहिराती केल्या.

  1. २००९ मधील काही जाहिरातींमध्ये डॅनिका पॅट्रिकच्या लैंगिक आकर्षणावर भर होता.
  2. २०१३ मध्ये मॉडेल बार रेफेली आणि एका पुरुषाचे अतिशयोक्तीपूर्ण चुंबन दाखवणाऱ्या जाहिरातीवरही टीका झाली.
  3. अमेरिकेतील National Organization for Women या संघटनेने अशा जाहिराती महिलांना व्यक्ती म्हणून न दाखवता पुरुषांच्या मनोरंजनासाठीच्या वस्तू म्हणून दाखवतात, असा आक्षेप घेतला. 

२. ESPNचा The Body Issue: सेरेना विल्यम्स आणि इतर खेळाडू (२००९-२०१९)

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.

या प्रकरणात नग्नतेचा संदर्भ वेगळा होता. अमेरिकेतील ESPNने आपल्या The Body Issue या विशेषांकात सेरेना विल्यम्स, व्हीनस विल्यम्स, रोंडा राउझी आणि अनेक महिला व पुरुष खेळाडूंची नग्न किंवा अर्धनग्न छायाचित्रे प्रसिद्ध केली.

या उपक्रमाचा घोषित उद्देश खेळाडूंच्या शरीराची रचना, शारीरिक क्षमता आणि शरीरातील विविधता साजरी करणे हा होता. सेरेना विल्यम्सने २००९ मधील आपल्या मुखपृष्ठावरील छायाचित्राचे कौतुक केले होते; ते तिला अभिरुचीपूर्ण वाटले.

सिडनी स्वीनीचे प्रकरण आणि या जाहिराती यात महत्त्वाचा फरक आहे. ESPNच्या उपक्रमात खेळाडू स्वतःच्या शरीरासह प्रत्यक्ष क्रीडा कामगिरीच्या संदर्भात सादर होत होते. Novigच्या जाहिरातीत मात्र अभिनेत्रीचे शरीर खेळाच्या साहित्याने झाकून दाखवणे हेच लक्षवेधी दृश्य होते. म्हणजेच, नग्नता समान असली तरी तिचा संदर्भ, उद्देश आणि दृश्याची रचना वेगळी असल्याने दोन्ही प्रकरणांचा सामाजिक अर्थही वेगळा असू शकतो.

३. Reebokची ‘Cheat on your girlfriend’ जाहिरात (२०१२)

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.


जर्मनीतील काही जिममध्ये Reebok ची एक जाहिरात खूपच चर्चेत आली होती. त्या जाहिरातीत असे लिहिले होते: “Cheat on your girlfriend, not on your workout.” (तुम्ही मैत्रिणीला फसवा, पण व्यायामाशी बेइमानी करू नका)

या जाहिरातीवर महिलांचा अपमान करणारा संदेश असल्याची टीका झाली. सोशल मीडियावर संताप व्यक्त झाल्यानंतर Reebokने जाहिरात काढून टाकली आणि आक्षेपार्ह साहित्य प्रसिद्ध झाल्याबद्दल खेद व्यक्त केला. कंपनीने ही जागतिक मोहीम नसल्याचेही स्पष्ट केले. हे प्रकरण सिडनी स्वीनीच्या प्रकरणाशी काहीसं साम्य दाखविणारं आहे. दोन्ही ठिकाणी जाहिरातीतून अधिकाधिक लक्ष मिळवण्याच्या प्रयत्नात महिलांविषयीचा सामाजिक संदेश वादाचा विषय बनला.

४. Good Good Golf आणि Callawayची वादग्रस्त जाहिरात (ऑगस्ट २०२६)

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.

सिडनी स्वीनीच्या जाहिरातीच्या काही आठवडे आधीच गोल्फच्या क्षेत्रात आणखी एक मोठा वाद झाला. Good Good Golf या गोल्फ-केंद्रित डिजिटल ब्रँडच्या जाहिरातीत Garrett Clark हा पुरुष सहसंस्थापक Alexis Miestowski या महिला गोल्फरला गोल्फ क्लब हातात घेण्याचा प्रयत्न केल्यावर जमिनीवर ढकलताना दाखवला होता. त्यानंतर तो स्वतःच्या क्लबला हात लावू नकोस, असा इशारा देतो.

जाहिरात विनोदी किंवा भयपटाची नक्कल म्हणून बनवल्याचे सांगितले गेले; परंतु प्रेक्षकांनी त्यात महिलांवरील हिंसेचे किरकोळ चित्रण असल्याचा आक्षेप घेतला.

५. सिडनी स्वीनीची स्वतःची American Eagle जाहिरात (२०२५)

सिडनी स्वीनीच्या स्पोर्ट्स जाहिरातीवरून वाद का निर्माण झाला? महिला खेळाडूंचे आक्षेप, जाहिरातीमागील उद्देश आणि खेळातील महिलांच्या प्रतिमेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा.


ही खेळाची जाहिरात नव्हती; मात्र स्वीनीच्या मार्केटिंगविषयक वादाची पार्श्वभूमी समजण्यासाठी ती महत्त्वाची आहे.

American Eagleच्या जीन्सच्या जाहिरातीत “Sydney Sweeney has great jeans” असा शब्दप्रयोग होता. इंग्रजीतील jeans आणि genes यांसारख्या उच्चारांच्या शब्दांवर आधारित जाहिरातीमुळे वाद झाला.

काही टीकाकारांनी यामध्ये गोऱ्या त्वचेच्या, निळ्या डोळ्यांच्या व्यक्तींच्या आनुवंशिक श्रेष्ठत्वाचा सूचक संदर्भ असल्याचा आरोप केला. कंपनीने मात्र ही जीन्सविषयीची जाहिरात असल्याचे सांगितले. स्वीनीनेही आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनांना समर्थन नसल्याचे स्पष्ट केले. 

वादग्रस्त अर्थनिर्णयामुळे जाहिरातीला अपेक्षेपेक्षा मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र, जाहिरातदाराने तो वाद जाणीवपूर्वक निर्माण केला होता, असे प्रत्येक वेळी सिद्ध होत नाही.

एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे नग्नता ही स्वतःमध्ये एकमेव निकष नाही. जाहिरातीचा उद्देश, तिच्यातील व्यक्तीची भूमिका, संमती, दृश्याचे सादरीकरण आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक संदेश हे सर्व घटक महत्त्वाचे असतात.

सौंदर्यापेक्षा कामगिरीचं उदात्तीकरण व्हावं

सिडनी स्वीनीच्या जाहिरातीला विरोध करणाऱ्या महिला खेळाडूंचा मुख्य संदेश स्पष्ट आहे, की महिलांनी खेळात मिळवलेले स्थान केवळ त्यांच्या सौंदर्यामुळे किंवा शरीरामुळे नाही, तर त्यांच्या प्रतिभेमुळे, सरावामुळे, शिस्तीमुळे आणि कामगिरीमुळे आहे.

दुसरीकडे, जाहिरातीच्या समर्थकांचा मुद्दा असा आहे, की प्रौढ अभिनेत्रीला आपल्या शरीराचे सादरीकरण करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक बोल्ड जाहिरात ही महिला खेळाडूंचा अपमान करण्यासाठीच केलेली असते असे नाही.

माझ्या मते, या दोन मुद्द्यांमध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करता येतो आणि त्याच वेळी महिला खेळाडूंनी व्यक्त केलेल्या नाराजीला गांभीर्याने घेता येते. प्रश्न फक्त सिडनी स्वीनीने किती कपडे घातले हा नाही; खेळाशी संबंधित जाहिरातीत महिलांना त्यांच्या कौशल्यामुळे महत्त्व दिले जाते की त्यांच्या शरीरामुळे, हा या वादाचा केंद्रबिंदू आहे.



Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.