Kheliyad

Advertisement
Badminton

बॅडमिंटनमधील प्रवाही ‘सिंधू’

November 30, 2015 · · comments

बॅडमिंटनमधील प्रवाही ‘सिंधू’
Pusarla Venkata Sindhu (born 5 July 1995) 


बॅडमिंटनमधील प्रवाही ‘सिंधू’

जिंकण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही. ती मात्र स्थितप्रज्ञ राहिली. यशाने हुरळून गेली नाही, की पराभवाने विचलितही झाली नाही. भलेही २०१३ च्या जागतिक स्पर्धेतील यशानंतर मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याची तिने हॅटट्रिक साधली. अर्थात, अन्य स्पर्धांत तिला यशाने हुलकावणीच दिली. आव्हाने मोठी असली तरी ती डिस्टर्ब होत नाही... 

महेश पठाडे
rhythm00779@gmail.com
Mob. 8087564549




चीनच्या अभेद्य भिंतींवर साईना नावाच्या लाटा आदळत असताना ‘सिंधू’चा प्रवाह कुणाच्या लक्षात आला नव्हता. मात्र, २०१३ मध्ये या प्रवाहाचा तडाखा जगाला प्रथमच जाणवला. मात्र, नदीला कधी तरी महापूर येतो आणि ओसरतोही...‘संथ वाहते कृष्णामाई’सारखा... मात्र, हा प्रवाह क्षणिक नव्हता. ती वादळापूर्वीची शांतता होती. मकाऊ ओपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकून तिने रविवारी अखेर ते सिद्ध केलं. बॅडमिंटनविश्वावरील नवी स्टार खेळाडू ‘पुसरला वेंकटा सिंधू’ (
Pusarla Venkata Sindhu) अर्थात पी. व्ही. सिंधू हिने साकारलेली ही कामगिरी.

रॅकेट स्पोर्टमध्ये आशिया खंडाचे वर्चस्व निर्विवाद आहे. सुरुवातीला अपर्णा पोपट, पी. गोपिचंद यांनी बॅडमिंटनविश्वावर भारताची ओळख निर्माण करून दिल्यानंतर साईना नेहवाल, नंतर पी. व्ही. सिंधूने ही ओळख अधिक सुस्पष्ट केली. बॅडमिंटनची आजची जागतिक क्रमवारी पाहिली तर पुरुष गटात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आठ खेळाडू आशिया खंडातील आहेत, तर दोन युरोप खंडातील. यात आशिया खंडातील आठव्या स्थानी भारताचा एकमेव के. श्रीकांत आहे. महिला गटातील पहिल्या २० खेळाडूंमध्येही १६ खेळाडू आशियातल्याच आहेत. त्यात दुसऱ्या स्थानी भारताची साईना, तर १२ व्या स्थानावर पी. व्ही. सिंधू आहे. उर्वरित युरोप खंडातील आहेत. या क्रमवारीवरूनच बॅडमिंटनचं चित्र स्पष्ट होतं. उर्वरित खेळाडूंमध्ये चीन, जपान, कोरियातील खेळाडूंचीच नावे सातत्याने चमकत आहेत. मात्र, हे चित्र फार काळ राहणार नाही असं आशादायी चित्र साईनानंतर पी.व्ही. सिंधूने पुन्हा एकदा निर्माण केलं आहे. 


खेळाविषयी तिची निष्ठा वादातीत आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटनचे धडे गिरवणारी पी. व्ही. सिंधू या खेळाकडे ठरवून आली, असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. वडील अर्जुन पुरस्कारप्राप्त व्हॉलीबॉलचे खेळाडू. असं असलं तरी ‘पीव्ही’ व्हॉलीबॉलकडे वळली नाही. २००१ मध्ये पुल्लेला गोपीचंदने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेला विजय आणि तत्कालीन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते त्याने स्वीकारलेला पुरस्कार पाहून ती भारावून गेली होती. इथेच तिचा खेळ निश्चित झाला आणि गोपीचंदच्याच मार्गदर्शनाखाली तिचा बॅडमिंटनचा प्रवास प्रशस्त झाला.


सिंधूने वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा रॅकेट उचलली. बॅडमिंटन कोर्ट आणि पीव्ही हे एक समीकरणच झालं होतं. रोज सात तास सराव करायचा. तिचं खेळाशी नातं इतकं घट्ट होतं, की घर ते पी. गोपीचंद अॅकॅडमी असा ५६ किलोमीटरचा प्रवास ती रोज करायची. यातून जो वेळ मिळायचा तो तिच्या शैक्षणिक अभ्यासासाठी. त्यावर ती म्हणायची, ‘‘बॅडमिंटनला पहिलं प्राधान्य, नंतर अभ्यास. शाळेत मला फक्त पास व्हायचं एवढंच माझं लक्ष्य!’’ पण ती शाळेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवायची हेही तितकच खरं.

Badminton player

पी. व्ही. सिंधूने २०१३ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. मकाऊ ओपनमधील सुवर्णपदकापेक्षाही हे ब्राँझ मेडल तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मेडल असेल. साईनाने जागतिक क्रमवारीत पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणे जसे भारतीय बॅडमिंटनला अभिमानास्पद आहे, तसेच पी. व्ही. सिंधूने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणे प्रत्येक भारतीयाला गौरवास्पद आहे. यापूर्वी महिलांमध्ये अपर्णा पोपट हे एकमेव भारतीय नाव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनवर ठसा उमटवून गेले होते. डेन्मार्कमध्ये १९९६ मध्ये तिने जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले होते. १९९८ मध्ये कॉमनवेल्थ गेममध्येही तिने सिल्व्हर मेडल जिंकण्याची किमया साधली होती. नऊ वेळा सीनिअर नॅशनल टायटल जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. प्रकाश पदुकोण यांच्या बरोबरीची ही कामगिरी होती. अपर्णा खेळत होती त्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे. त्या वेळी महाराष्ट्रात प्रशिक्षक फारसे नव्हतेच. आजही तीच परिस्थिती आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात पी. गोपीचंद म्हणाले होते, की ‘महाराष्ट्रात बॅडमिंटन समृद्ध असलं तरी त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडणारे प्रशिक्षक नाहीत!’ केवळ बॅडमिंटनच नाही, तर अन्य खेळांतही हीच अवस्था आहे. काहीही असो, खेळावर निष्ठा असलेल्या खेळाडूंची प्रतिभा कधीही झाकोळत नाही, हे पी. व्ही. सिंधूने स्पष्ट केले आहे.

हार न मानणारी खेळाडू

अनुकूल- प्रतिकूल कशीही परिस्थिती असली तरी सिंधू मात्र स्थितप्रज्ञ राहिली. विनातक्रार फक्त सराव करीत राहिली. नवनवीन काही तरी शिकत राहिली. एक वेळ अशी होती, की आतापर्यंत म्हणजे जवळपास दीड-दोन वर्षे तिला कोणत्याही स्पर्धेत चमक दाखवता आलेली नव्हती. २०१३ मध्ये मलेशिया ओपन बॅडमिंटन ग्रँडप्रिक्स गोल्ड स्पर्धेतील गोल्ड मेडलव्यतिरिक्त तिने कोणतेही मेडल जिंकलेले नव्हते. जागतिक स्पर्धेतील मेडलनंतर एखादा खेळाडू बॅडपॅचमध्ये असेल तर त्याची अवस्था काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी. अशा वेळी मनःस्थिती दोलायमान होते. जागतिक स्पर्धा जिंकल्यानंतर टीकाकारांचा सूर बेसूर होतो... आता बस एवढंच; पुढे काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. पण जीवतोड मेहनत आणि देशासाठी सर्वोत्तम खेळण्याकडेच तिने लक्ष दिलं. म्हणूनच सिंधू कधी डगमगली नाही. तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांनीही तिच्याबाबत म्हंटलंच होतं, की सिंधू कधीच हार न मानणारी खेळाडू आहे. मकाऊ ओपन जिंकून तिची ही विजिगीषू वृत्ती दिसून येते. तिच्या दृष्टीने तीन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा अभ्यास आणि कोर्टवरील व्यूहरचना. तिचा फोकस या तीन गोष्टींवरच राहिला आहे. रॅकेट स्पोर्टवर भारतीय खेळाडूंचा दबदबा अबाधित राखण्यात म्हणूनच सिंधूचा वाटा मोलाचाच राहिला आहे.

पी. व्ही. सिंधूच्या यशानंतर एक कुतूहल भारतीयांमध्ये नेहमीच राहिलं आहे. ते म्हणजे साईनाविरुद्धचा तिचा सामना. खरं तर दोघींमध्ये स्पर्धा अजिबात नाही. आयबीएलमध्ये मात्र या दोघींच्या सामन्याबाबत कमालीची उत्सुकता होती. साईनाकडे अनुभव आहे. सिंधू अवघी विशीतली खेळाडू. तिला अजून बरेच शिकायचे आहे. साईनाने कारकिर्दीत ४५२, तर सिंधूने २२७ सामने खेळले आहेत. त्यामुळे अनुभवाच्या कसोटीवर साईना उजवी आणि वरिष्ठ खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडू भारतीय बॅडमिंटनची ताकद आहे. सिंधूने २२७ पैकी १५५ सामने जिंकले, तर ७२ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. यंदाच्या मोसमात तिला ३० पैकी १७ सामने गमवावे लागले आहेत. किती सामने गमावले किंवा जिंकले याचा हिशेब सिंधूने कधीच केला नाही. पराभवाचं दुःख तिने कधीच बाळगलं नाही. त्यापेक्षा वीरांगणेसारखं लढण्याचं समाधान तिला जास्त महत्त्वाचं आहे. निष्ठेने खेळत राहणे म्हणजे सतत प्रवाही राहणं. ‘सिंधू’चा हाच प्रवाहीपणा तिचं मन कधीही गढूळ करीत नाही. निष्ठा स्वच्छ राहते. तिला माहिती आहे त्सुनामी कधी तरीच येते. प्रवाह मात्र सातत्याने यशाची तहान भागवत राहतो...! 


(Maharashtra Times : 30 Nov. 2015)

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.